
सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्यावतीने मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान २०२५/२६ अंतर्गत जिल्हा परिषदेकडील विविध विकास कामांचा शुभारंभ व लोकार्पण तसेच वैयक्तिक लाभ वितरण व सन्मानाचा महासोहळा शनिवार १० जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता येथील इच्छापूर्ती मंगल कार्यालय येथे आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्त अंगणवाडी सेविका आणि बचतगट महिला प्रतिनिधी यांचा मेळावाही आयोजित करण्यात आला आहे. याचे ऑनलाईन उद्घाटन पालकमंत्री नितेश राणे यांच्याहस्ते होणार आहे.
यावेळी खा नारायण राणे, आ दीपक केसरकर, आ निलेश राणे, आ निरंजन डावखरे, आ ज्ञानेश्वर म्हात्रे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. यावेळी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, जिल्हा पोलिस अधीक्षक मोहन दहिकर हे निमंत्रित अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शीतल कबनुरे पुंड, उपमुख्य कार्यकारी अधिकारी जयप्रकाश परब आदी उपस्थित असणार आहेत.
राज्य शासन १७ सप्टेंबर २०२५ ते ३१ मार्च २०२६ या कालावधीत मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान राबवित आहे. जिल्ह्यातील सर्व ४३३ ग्रामपंचायतींनी या अभियानात सहभाग घेतला आहे. यानिमित्त प्रत्येक ग्रामपंचायत नियमित उपक्रमासह विविध नावीन्यपूर्ण उपक्रम राबवित आहेत. याशिवाय जिल्हा परिषद स्वनिधीतून असंख्य विकासकामे मंजूर करण्यात आली आहेत. त्यातील काही कामे पूर्ण झाली आहेत. तर काही कामे सुरू व्हायची आहेत. तसेच जिल्हा नियोजन निधीतून अनेक कामे मंजूर करण्यात आली असून त्यातील काही कामे पूर्ण झाली आहेत. असंख्य वैयक्तिक लाभाच्या योजना राबविण्यात येतात. या मेळाव्या निमित्त पूर्ण झालेल्या कामांचे लोकार्पण, नव्याने मंजूर झालेल्या कामांचे भूमिपूजन ऑनलाईन पद्धतीने आणि वैयक्तिक लाभाच्या योजनांचे वितरण पालकमंत्री राणे यांच्याहस्ते केले जाणार आहे.
जिल्हा परिषदेने पूर्ण जिल्ह्यासाठी हा ऑनलाईन मेळावा आयोजित केला आहे. तसेच कामांचे लोकार्पण आणि भूमिपूजन पालकमंत्री राणे यांच्याहस्ते ऑनलाईन होणार आहे. त्यामुळे मेळाव्याला केवळ अंगणवाडी सेविका आणि बचतगटाच्या महिला प्रतिनिधी यांना बोलाविण्यात आले आहे. गटविकास अधिकारी मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत. परंतु या मेळावा कार्यक्रमाचे ऑनलाईन प्रक्षेपण प्रत्येक ग्रामपंचायतीत होणार आहे. याचे नियोजन पंचायत समिती स्तरावरून त्या त्या तालुक्यातील ग्रामपंचायतींसाठी करण्यात येणार आहे. त्यामुळे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत अधिकारी, ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ आपापल्या ग्रामपंचायत येथे उपस्थित राहून या मेळाव्याला उपस्थिती दर्शविणार आहेत.










