
सिंधुदुर्गनगरी : अंध दिव्यांग व्यक्तींना कोणाच्याही मदतीशिवाय समाजाच्या मुख्य प्रवाहात सन्मानाने आणि आत्मविश्वासाने वावरता यावे, तसेच डोळस व्यक्तींना अंध व्यक्तींना मदत करण्याची योग्य व संवेदनशील पद्धत समजावी, या उद्देशाने मालवण येथील बॅ. नाथ पै सेवांगण येथे दोन दिवसीय स्वयंसिद्धता निवासी कार्यशाळा यशस्वीपणे पार पडली. महात्मा गांधी सेवा संघ संचलित सिंधुदुर्ग जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र आणि साईकृपा अपंगशक्ती बहुउद्देशीय शिक्षण संस्था, कसाल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यशाळेचे उद्घाटन मालवण नगरपालिकेच्या नगराध्यक्षा ममता वराडकर यांच्या हस्ते झाले.
या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष अनिल शिंगाडे, दिव्यांग वित्त विकास महामंडळाचे निवृत्त महाव्यवस्थापक नंदकुमार फुले, पुणे जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राचे समुपदेशक हरिदास शिंदे, राष्ट्रीय दृष्टीहीन संघाचे कोकण विभागीय अध्यक्ष बाबुराव गावडे, मातृत्व आधार फाऊंडेशनचे सचिव दादा वेंगुर्लेकर, कार्यशाळा समन्वयक स्वागत थोरात, सहाय्यक प्रशिक्षक स्वरुपा देशपांडे व रेवा कदम यांच्यासह मोठ्या संख्येने अंध दिव्यांग व डोळस प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.
कार्यशाळेत अंध दिव्यांग व्यक्तींसाठी अत्यंत उपयुक्त असलेल्या पांढऱ्या काठीचा शास्त्रीय वापर, पायऱ्या चढणे-उतरणे, रस्ता ओलांडणे, फुटपाथवर सुरक्षित चालणे, हस्तांदोलन यासह दैनंदिन व्यवहारातील विविध कृतींचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक व सराव करून घेण्यात आला. तसेच गंध व स्पर्शाच्या आधारे धान्य व भाज्या ओळखणे, आवाजांवरून दिशा व अंतर ओळखणे यासंबंधी मार्गदर्शन करण्यात आले. स्नायूंची लवचिकता वाढवणारे व्यायाम, श्रवणशक्ती व स्मरणशक्ती वाढवणारे खेळ यामुळे सहभागी अंध दिव्यांगांमध्ये आत्मविश्वास आणि सकारात्मकतेचा नवा संचार झाला.
बॅ. नाथ पै सेवांगण, मालवण व लायन्स क्लब, मालवण यांच्या सहकार्याने पार पडलेल्या या कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनासाठी अनिल शिंगाडे, बाबुराव गावडे, दादा वेंगुर्लेकर, विशाखा कासले, प्रसन्ना शिर्के, ललित गावडे, अरविंद आळवे, प्रकाश वाघ, रंजना इंदुलकर यांनी विशेष परिश्रम घेतले.










