
सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्याचे पालकत्व स्वीकारल्यानंतर जिल्ह्यातील सर्व अवैध धंदे बंद करण्याचा आणि पुढील पाच वर्षांत जिल्ह्यातच मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती करण्याचा ठाम निर्णय घेतला असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री नितेश राणे यांनी केले. परजिल्ह्यात रोजगारासाठी गेलेल्या तरुणांपैकी किमान ५० टक्के तरुणांना पुन्हा जिल्ह्यात आणून त्यांना रोजगार देण्याचा प्रयत्न असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. अवैध धंदे बंद करताना कोणतीही राजकीय किंमत मोजावी लागली तरी मागे हटणार नाही, मात्र या लढ्यात जिल्ह्यातील पत्रकारांनी प्रशासनाला साथ द्यावी, असे आवाहन त्यांनी केले. सिंधुदुर्गनगरी येथील आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर स्मारक व पत्रकार भवन येथे सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाच्यावतीने आयोजित पत्रकार दिन व पत्रकार पुरस्कार वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
यावेळी मार्गदर्शक म्हणून ज्येष्ठ पत्रकार प्रसन्न जोशी, जिल्हाध्यक्ष उमेश तोरसकर, मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी जयप्रकाश परब, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा सचिव बाळ खडपकर, खजिनदार संतोष सावंत, परिषद प्रतिनिधी गणेश जेठे यांच्यासह पत्रकार संघाचे पदाधिकारी, जिल्ह्यातील पत्रकार व पत्रकारप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मंत्री राणे पुढे म्हणाले की, जिल्ह्यात मटका, जुगार व इतर अवैध धंदे सुरू ठेवण्यासाठी मोठ्या ऑफर्स देण्यात आल्या होत्या; मात्र अशा पैशांना कधीही बळी पडणार नसल्याचा ठाम निर्धार आहे. जिल्ह्याची तरुण पिढी वाचवण्यासाठी कोणतीही तडजोड केली जाणार नाही. आपण पालकमंत्री असेपर्यंत जिल्ह्यात एकही अवैध धंदा सुरू होऊ दिला जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. ऑनलाईन बॅटिंग, मटका आणि दारूच्या व्यसनामुळे अनेक कुटुंबे उद्ध्वस्त होत असून माता-भगिनींना अश्रू ढाळावे लागत आहेत. ही परिस्थिती बदलली नाही तर ‘पालक’ म्हणून आपले अस्तित्व निरर्थक ठरेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
याच कार्यक्रमात त्यांनी जिल्ह्याच्या विकासाचा रोडमॅप मांडताना सांगितले की, मुख्यमंत्री कार्यालयाकडून सिंधुदुर्गातील जमीन व प्रकल्पांबाबत सातत्याने माहिती घेतली जात आहे. येत्या वर्षभरात जिल्ह्यात मोठे कारखाने येतील आणि २०२९ पर्यंत किमान ४० ते ५० टक्के तरुणांना जिल्ह्यातच नोकऱ्या मिळतील अशी व्यवस्था उभी केली जाईल. एका बाजूला रोजगार आणि दुसऱ्या बाजूला व्यसन हे चालणार नाही, असे त्यांनी ठामपणे नमूद केले. या सामाजिक व विकासात्मक लढ्यात पत्रकारांनी प्रशासनाला साथ द्यावी, असे आवाहन त्यांनी शेवटी केले. तसेच सिंधुदुर्गनगरी येथील सिंधू दर्पण गृहनिर्माण संस्थेला मान्यता देण्यात आली असून दोन दिवसांत भूखंड वाटप केले जाईल, अशी माहितीही त्यांनी दिली.
मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांनी प्रशासन व पत्रकार समाजाच्या उन्नतीसाठी परस्परपूरक भूमिका बजावत असल्याचे सांगत सिंधुदुर्गातील पत्रकारिता सकारात्मक असल्याचे नमूद केले. भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी पत्रकारांशी असलेल्या मैत्रीचा अनुभव सांगितला. यावेळी पत्रकार भवनातील वाचनालयासाठी आ. निरंजन डावखरे यांनी कै. वसंत डावखरे यांच्या नावाने असलेल्या ट्रस्टच्या माध्यमातून ४० हजार रुपये किमतीची पुस्तके पत्रकार संघाकडे सुपूर्द केली. अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे व उपमुख्य कार्यकारी अधिकारी जयप्रकाश परब यांनीही आपले विचार मांडले. ज्येष्ठ पत्रकार प्रसन्न जोशी यांनी बदलती पत्रकारिता व आवश्यक बदलांवर मार्गदर्शन केले.
जिल्हा पत्रकार संघाच्यावतीने देण्यात येणारे उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार देवगड – अयोध्याप्रसाद गावकर, कणकवली – सुधीर राणे, मालवण – अर्जुन बापर्डेकर, कुडाळ – प्रशांत पोईपकर, सावंतवाडी – सागर चव्हाण, वेंगुर्ला – प्रदीप सावंत, सिंधुदुर्गनगरी – लवू म्हाडेश्वर, दोडामार्ग – ओम देसाई, वैभववाडी – महेश रावराणे या नऊ पत्रकारांना मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, सन्मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन प्रदान करण्यात आले. प्रास्ताविक बाळ खडपकर यांनी केले तर सूत्रसंचालन गणेश जेठे यांनी केले.










