
सिंधुदुर्गनगरी : गेल्या वर्षात प्राथमिक शिक्षकांचे विविध प्रश्न प्रलंबित राहिले असून सदर प्रश्न ५ जानेवारी २०२६ पर्यंत न सोडविले गेल्यास ७ जानेवारी २०२६ पासून जिल्हा परिषद सिंधुदुर्ग शिक्षणाधिकारी प्राथमिक यांचे दालनासमोर बेमुदत साखळी आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा प्राथमिक शिक्षक समितीने दिला आहे.
माहे ऑगस्ट २०२६ मध्ये संघटनेने आंदोलनाची नोटीस प्रशासनाला दिली होती. त्यावेळी लवकरच सर्व प्रश्न निकाली काढली जातील असे आश्वासन देण्यात आले होते. परंतु तिथपासून आजपर्यंत प्रश्न निकाली न निघता अधिकाधिक जटील होत गेले आहेत. यामुळे प्राथमिक शिक्षकांत असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. सदर प्रश्न येत्या ५ जानेवारी २०२६ पूर्वी निकाली न निघाल्यास ७ जानेवारी २०२६ पासून बेमुदत साखळी आंदोलन शिक्षणाधिकारी प्राथमिक यांचे कार्यालयासमोरील मोकळ्या जागेत छेडण्यात येणार असल्याचे जिल्हाध्यक्ष विठ्ठल गवस व जिल्हा सरचिटणीस तुषार आरोसकर यांनी नोटीसद्वारे मुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षणाधिकारी प्राथमिक यांना कळविले आहे.










