
सिंधुदुर्गनगरी : प्रशासनाकडे वारंवार पत्रव्यवहार व प्रत्यक्ष चर्चा करूनही प्रश्न मार्गी न लागल्याने शिक्षकांमध्ये तीव्र असंतोष आहे. पदवीधर शिक्षकांच्या सातव्या वेतन आयोगानुसार वेतनातील त्रुटी दूर करून खुल्लर समितीच्या शिफारशीनुसार वेतन निश्चिती करणे, गणित व विज्ञान विषय शिक्षकांना मधून पदोन्नती देऊन वेतनश्रेणी मंजूर करणे, सन २००५ पूर्वी सेवेत रुजू झालेल्या शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करणे, अशा प्रमुख मागण्यांसाठी अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ, सिंधुदुर्गच्या वतीने आज जिल्हा परिषद कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. दुपारी २ ते सायंकाळी ६ या वेळेत शांततेच्या मार्गाने पार पडलेल्या या आंदोलनात शिक्षकांनी जोरदार घोषणाबाजी केली.
सन २०२२ पासून प्रलंबित वरिष्ठ व निवड वेतनश्रेणीचे प्रस्ताव तात्काळ मंजूर करणे, विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख व मुख्याध्यापक ही पदे पदोन्नतीने भरणे, पवित्र पोर्टलद्वारे नवनियुक्त शिक्षण सेवक, उपशिक्षक व पदवीधर विशेष शिक्षकांची सेवा जेष्ठता यादी प्रसिद्ध करणे, या मागण्यांकडेही प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले. यासोबतच शिक्षण सेवक कार्यकाल पूर्ण झालेल्या शिक्षकांना नियमित शिक्षकपदी आदेश देऊन वेतन निश्चिती करणे, सन २०१४ पूर्वीच्या पदवीधर शिक्षकांना विषय बदलाची संधी देणे, गेल्या तीन ते चार वर्षांपासून प्रलंबित असलेली वैद्यकीय देयके मंजूर करणे, २०२० मध्ये मंजूर झालेल्या चटोपाध्याय वेतनश्रेणीचा फरक अदा करणे, तसेच शिक्षकांवर टाकल्या जाणाऱ्या अनावश्यक अशैक्षणिक कामांचा ताण कमी करावा, अशी मागणी संघटनेने केली.
आंदोलनादरम्यान मुख्य कार्यकारी अधिकारी आणि प्राथमिक शिक्षणाधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आले. मागण्या तात्काळ मान्य न झाल्यास पुढील काळात आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशाराही अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने देण्यात आला. यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण वळवी, राजाराम कविटकर, संतोष मराठे, दत्तात्रय सावंत, दत्ताराम सावंत, संजय चाफे, एकनाथ कुर्लेकर, राजेंद्र चव्हाण, अरुणा ढाकणे आदी उपस्थित होते.










