अल्पसंख्याक हक्क दिन उत्साहात साजरा

मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रशासन कटिबद्ध : सीईओ रविंद्र खेबुडकर
Edited by: लवू म्हाडेश्वर
Published on: December 18, 2025 17:22 PM
views 69  views

सिंधुदुर्गनगरी : अल्पसंख्याक समाजाच्या समावेशक विकासासाठी शासन कटिबद्ध असून समाजातील प्रत्येक घटकाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रशासन सातत्याने प्रयत्नशील आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर यांनी केले. अल्पसंख्याक समाजाच्या हक्कांचे संरक्षण, समानता व सामाजिक सलोखा याबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने दरवर्षी १८ डिसेंबर रोजी साजरा करण्यात येणाऱ्या अल्पसंख्याक हक्क दिना’ निमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

या कार्यक्रमाला अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी बालाजी शेवाळे, जिल्हा नियोजन अधिकारी यशवंत बुधावले, जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत, सहायक जिल्हा नियोजन अधिकारी वैशाली मळेकर यांच्यासह ॲड. अशफाक शेख, शहानवाज शहा, निसार शेख, ॲड. बापूशा अशिर अहमद पटेल, शेरपुद्दीन महंमद बोबडे, नितीन जठार, नामदेव मठकर, मुराद अली शेख, बुलंद पटेल, सलमान शेख, प्रकाश मोहिरे, रावजी यादव, फादर मॅन्युअल डिसिल्वा आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रस्तावनेत जिल्हा नियोजन अधिकारी यशवंत बुधावले यांनी अल्पसंख्याक हक्क दिनाचे महत्त्व स्पष्ट केले. भारत हा विविधतेने नटलेला देश असून “वसुधैव कुटुंबकम्” ही भावना आपल्या समाजाच्या केंद्रस्थानी आहे. कोणत्याही लोकशाही राष्ट्राची खरी ओळख ही त्या देशातील अल्पसंख्याक समाजाला मिळणाऱ्या सन्मान, सुरक्षितता व संधींवर अवलंबून असते, असे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी अल्पसंख्याक समाजासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजना व उपक्रमांची सविस्तर माहिती सादरीकरणाद्वारे दिली. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित विविध समाज बांधवांनी आपली मनोगते व्यक्त करत सामाजिक सलोखा, समानता व विकासासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज अधोरेखित केली.