
सिंधुदुर्गनगरी : जलजीवन मिशन अंतर्गत जिल्ह्यातील पाणीपुरवठा योजनांची कामे पूर्णतः रखडलेली असून आजपर्यंत एकही नवीन नळ पाणीपुरवठा योजना पूर्ण झालेली नाही. ज्या काही कामांची नोंद पूर्ण म्हणून दाखवली जात आहे ती केवळ दुरुस्तीची कामे असून प्रत्यक्षात नागरिकांना पिण्याचे पाणी मिळत नसल्याची गंभीर बाब समोर आली आहे. ही सर्व रखडलेली कामे येत्या १५ दिवसांत मार्गी न लागल्यास सरपंच व ग्रामस्थांना सोबत घेऊन जिल्हा परिषदेवर मोर्चा काढणार, असा ठाम इशारा माजी आमदार वैभव नाईक यांनी दिला आहे.
जलजीवन मिशनची कामे रखडल्याबाबत जाब विचारण्यासाठी माजी आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली ठाकरे सेनेच्या शिष्टमंडळाने मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेंबूडकर यांची भेट घेतली. यावेळी ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता संदेश राणे, उपअभियंता वैभव वाळके, युवा सेनेचे मंदार शिरसाट, बबन बोभाटे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी कार्यकारी अभियंता संदेश राणे यांनी जिल्ह्यात जलजीवन मिशन अंतर्गत एकूण ७१८ कामे मंजूर असून त्यापैकी ३१५ कामे पूर्ण झाल्याचा दावा केला. मात्र, यातील बहुतांश कामे ही फक्त दुरुस्तीची असल्याचे माजी आमदार वैभव नाईक यांनी निदर्शनास आणून दिले. एकही नवीन नळ पाणीपुरवठा योजना पूर्ण झालेली नसल्याचे स्पष्ट होताच अधिकाऱ्यांकडे समाधानकारक उत्तर नव्हते.
निधीअभावी कामे रखडल्याची कबुली अधिकाऱ्यांनी दिली. तसेच अनेक ठिकाणी कंत्राटदारांनी कामे अर्धवट टाकून पलायन केल्याचे आणि काही ठिकाणी वीज विभागाकडून सहकार्य मिळत नसल्याचेही समोर आले. यानंतर सर्व कामांचा तातडीने आढावा घेऊन जलजीवन मिशनची कामे मार्गी लावण्याचे आश्वासन मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेंबूडकर यांनी दिले.
यानंतर पत्रकारांशी बोलताना माजी आमदार वैभव नाईक म्हणाले, ‘हर घर नल’चा गाजावाजा करत शासनाने जलजीवन मिशन सुरू केले, मात्र या योजनेसाठी आवश्यक निधीच मिळालेला नाही. याला सत्ताधारी मंत्री, आमदार व खासदार जबाबदार आहेत. त्यांचे लक्ष फक्त निवडणुकांपुरते मर्यादित असून जनतेच्या मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष केले जात आहे. पैसे नसल्याने कंत्राटदार कामे अर्धवट सोडून जात आहेत. ग्रामीण भागात लोक पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे.’ मुख्य कार्यकारी अधिकारी सकारात्मक दिसले असले तरी १५ दिवसांत ठोस कार्यवाही झाली नाही, तर सरपंच व नागरिकांना घेऊन जिल्हा परिषदेवर तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही माजी आमदारांनी दिला.










