
कुडाळ : मेरा युवा भारत सिंधुदुर्ग (युवा कार्यक्रम एवं खेल मंत्रालय, भारत सरकार) व कोकण कला व शिक्षण विकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने जयप्रकाश नारायण माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय वाडोस हायस्कूलच्या मैदानावर तालुका स्तरीय क्रीडा स्पर्धांचे भव्य आयोजन उत्साहात पार पडले. या स्पर्धेस विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून क्रीडा महोत्सव गाजवला.
स्पर्धेचे उद्घाटन वाडोस हायस्कूलचे शिक्षक डॉ. आनंद राठ्ये, कोकण संस्था समन्वयक सौ. गौरी आडेलकर, शिक्षक श्री. विठोबा कडव, श्री. हर्षद धुरी, सौ. दीक्षा म्हाडगुत, सौ. श्रेया पवार, क्रीडा प्रशिक्षक श्री. सिताराम जाधव, हिमाली सावंत, सौ. शिल्पा कडव, सौ. आराध्या भिसे आणि श्री. विजय चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. मान्यवरांनी विद्यार्थ्यांना क्रीडा संस्कार, शिस्त, संघभावना व निरोगी स्पर्धेचे महत्त्व पटवून दिले. मुलांसाठी कबड्डी, १०० मीटर धावणे, गोळाफेक तर मुलींसाठी खो-खो, १०० मीटर धावणे व गोळाफेक अशा क्रीडा प्रकारांचे आयोजन करण्यात आले होते. खेळाडूंनी दमदार प्रदर्शन करत प्रेक्षकांची दाद मिळवली.
विजेत्या खेळाडूंना भारत सरकार युवा व क्रीडा मंत्रालयाचे प्रमाणपत्र व चषक देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. पारितोषिक वितरण सोहळ्यात उत्कृष्ट खेळाडू व विजेत्या संघांचा गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ. गौरी आडेलकर यांनी केले. आभार सौ. रूचा पेडणेकर यांनी मानले. शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मैदान व्यवस्थेसह विविध नियोजनात मोलाची भूमिका बजावली.










