राजपत्रित अधिकारी संघटनेचा कडक पवित्रा

Edited by:
Published on: December 08, 2025 19:07 PM
views 32  views

सिंधुदुर्गनगरी : घरकुल आणि मनरेगा योजनांमध्ये जबाबदारी निश्चितीबाबत शासनस्तरावर अद्याप कोणताही ठोस निर्णय न झाल्याने महाराष्ट्र विकास सेवा राजपत्रित अधिकारी संघटनेने अखेर कडक पवित्रा घेतला आहे. आजपासून (८ डिसेंबर) संपूर्ण जिल्ह्यातील विकास सेवा अधिकारी सामूहिक रजा आंदोलनावर गेले असून मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच राहणार आहे. याबाबतचे निवेदन महाराष्ट्र सेवा विकास राजपत्रित अधिकारी संघटना सिंधुदुर्गच्या वतीने अप्पर जिल्हाधिकारी शुभांगी साठे यांना देण्यात आले आहे.

यावेळी संघटनेचे अध्यक्ष जयप्रकाश परब, उपाध्यक्ष अरुण चव्हाण, सचिव वासुदेव नाईक आणि खजिनदार मनोजकुमार बेहरे यांच्यासह अन्य राजपत्रित अधिकारी उपस्थित होते. घरकुल व मनरेगा योजनांची अंमलबजावणी करताना जबाबदारी निश्चितीचा मुद्दा राज्यभर ऐरणीवर आहे. त्यामुळे जबाबदारी निश्चिती करण्यासाठी संघटनेने ४ व ५ डिसेंबर या दोनदिवसाच्या सामूहिक रजेचा इशारा दिला होता. मात्र त्यानंतर कोणताही समन्वय न झाल्याने ही संघटना आक्रमक झाली आहे. या ही संघटना आपल्या मागणीसाठी आजपासून (८ डिसेंबर रोजी) बेमुदत सामुहिक रजा आंदोलनावर गेले आहेत. 

दरम्यान, सामूहिक रजेच्या काळात कोणतेही प्रशासकीय कामकाज तसेच भ्रमणध्वनीवरील सेवा न देण्याचा निर्णय अधिकाऱ्यांनी घेतला आहे. मागण्यांशी संबंधित सविस्तर निवेदन ई-मेलद्वारे शासनाकडे सकारात्मक शिफारशींसह पाठवावे, अशी विनंती संघटनेने दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.