
सिंधुदुर्गनगरी : राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत जिल्ह्यातील सर्व पात्र लाभार्थ्यांची ई-केवायसी, आधार सिंडींग, मोबाईल सिंडींग तसेच शिधापत्रिका ऑनलाईन करण्याच्या प्रक्रियेला गती देण्याबाबत महत्त्वपूर्ण बैठक जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या बैठकीला जिल्हा पुरवठा अधिकारी विजय सहारे तसेच जिल्ह्यातील पाच तालुक्यातील निरीक्षण अधिकारी, सर्व पुरवठा निरीक्षक आणि अन्य अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
बैठकीत जिल्हाधिकारी यांनी स्पष्ट निर्देश देत सांगितले की, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १,७८,७१७ लाभार्थ्यांची ई-केवायसी अद्याप प्रलंबित असून ही प्रक्रिया दिनांक ३० नोव्हेंबर २०२५ पूर्वी शंभर टक्के पूर्ण करणे बंधनकारक आहे. संबंधित लाभार्थ्यांनी आपापल्या रास्तभाव दुकानदारांकडे जाऊन तात्काळ ई-केवायसी करावी, असे आवाहन करण्यात आले. आधार सिंडींगबाबत, जिल्ह्यातील १२,३५६ लाभार्थ्यांचे आधार क्रमांक शिधापत्रिकेशी अजूनही संलग्न झालेले नाहीत. त्यामुळे सर्व पात्र लाभार्थ्यांचे आधार क्रमांक तात्काळ जोडण्याचे निर्देश देण्यात आले.
मोबाईल सिंडींग प्रक्रियेतही मोठ्या प्रमाणात काम शिल्लक असून ३,९३,२३९ लाभार्थ्यांचे मोबाईल क्रमांक अद्ययावत करणे बाकी आहे. शिधापत्रिकेतील किमान एका सदस्याचा मोबाईल क्रमांक जोडणे अत्यावश्यक असल्याचे जिल्हाधिकारी यांनी स्पष्ट केले. त्याचप्रमाणे आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा फुले जनआरोग्य योजना यांतर्गत शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्यांची कार्ड निर्मिती सुलभ होण्यासाठी शिधापत्रिका ऑनलाईन करण्याचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. यासाठी संबंधितांनी तहसील कार्यालयाच्या पुरवठा शाखेत शिधापत्रिका व आधार कार्ड जमा करावे किंवा RCMS.MAHAFOOD.GOV.IN वरील पब्लिक लॉगिनचा उपयोग करून स्वतःही प्रक्रिया पूर्ण करता येईल.
शेवटी, राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेतील धान्याचे १०० टक्के उचल व वेळेत वाटप करण्याचे निर्देश सर्व संबंधित विभागांना देण्यात आले. बैठकीस संबंधित अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी यांनी दिलेले स्पष्ट मार्गदर्शक निर्देश लक्षात घेता, सर्व लाभार्थ्यांनी ई-केवायसी, आधार व मोबाईल सिंडींग तात्काळ पूर्ण करण्याचे आवाहन प्रशासनामार्फत करण्यात येत आहे.










