बिहारचा विजय हा विकासनितीचा परिपाक : प्रभाकर सावंत

Edited by: लवू म्हाडेश्वर
Published on: November 14, 2025 18:06 PM
views 87  views

सिंधुदुर्गनगरी : भारतीय जनता पक्षाने बिहारमध्ये साधलेला विजय हा विकासकारभार, सुशासन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावरील जनतेचा दृढ विश्वास यांचा विजय असल्याचे मत भाजपा सिंधुदुर्गचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी आज व्यक्त केले. भाजपतर्फे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी भाजपाचे जिल्हा सरचिटणीस रणजित देसाई उपस्थित होते.

पत्रकार परिषदेत जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत म्हणाले, “बिहारमधील विजय हा फक्त मतांचा विजय नसून तिथल्या जनतेने केलेल्या विश्वासाचा विजय आहे. केंद्र सरकारच्या विकासनितीचा, गोरगरिबांसाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांचा आणि स्थिर प्रशासनाचा हा परिणाम आहे. लोकांनी पुन्हा एकदा प्रामाणिक नेतृत्वाला कौल दिला आहे.”

त्यांनी पुढे सांगितले की, बिहारमध्ये भाजपा आणि मित्रपक्षांनी राबविलेल्या विकासकामांची स्पष्ट छाप जनतेला दिसली असून, याचमुळे विरोधकांची खोटी कथानके जनता नाकारत आहे. “हा विजय देशभरातील भाजप कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह निर्माण करणारा आहे,” असेही सावंत म्हणाले. जिल्हा सरचिटणीस रणजित देसाई यांनीही बिहारच्या विजयाचे स्वागत करताना सांगितले की, “हा विजय बूथस्तरावरील कार्यकर्त्यांच्या अथक परिश्रमाचा, तसेच केंद्रातील सरकारच्या निर्णयक्षमतेचा परिपाक आहे. भाजपा जे बोलते ते करते, हा संदेश बिहारच्या मतदारांनी पुन्हा एकदा देशासमोर ठेवला आहे.”

पत्रकार परिषदेत येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरही पक्षाच्या तयारीवर चर्चा झाली. जिल्हा स्तरावर पक्ष अधिक सक्षम करण्यासाठी संघटनात्मिक बळकटीकरण सुरू असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले. “सिंधुदुर्ग जिल्ह्यात विकासाच्या मुद्द्यावरच निवडणूक लढविली जाणार आहे. जिल्ह्यातील प्रत्येक मतदारापर्यंत केंद्र सरकारच्या योजना आणि पक्षाची कार्यपद्धती पोहोचविण्यासाठी आम्ही सज्ज आहोत,” असेही प्रभाकर सावंत यांनी स्पष्ट केले.