
सिंधुदुर्गनगरी : महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आणि प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तसेच अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सिंधुदुर्ग डॉ. सुधीर देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सिंधुदुर्गतर्फे लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण कायदा (POCSO Act) या विषयावर जनजागृती शिबिराचे आयोजन रायसाहेब डॉ. रामजी धोंडजी खानोलकर हायस्कूल, मठ (वेंगुर्ला) येथे करण्यात आले.
या शिबिरात ॲड. सुषमा प्रभूखानोलकर यांनी विद्यार्थ्यांना पोक्सो कायद्याच्या विविध तरतुदींचे सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले की, “हा कायदा शिक्षेची भीती निर्माण करण्यासाठी नसून प्रत्येक बालक सुरक्षित राहावे यासाठी उभारलेली एक सक्षम कायदेव्यवस्था आहे.” पालक, शिक्षक व विद्यार्थ्यांनी या कायद्याबाबत संपूर्ण माहिती असणे अत्यावश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले. कार्यक्रमाला श्रीमती श्वेता सावंत (लिपिक, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सिंधुदुर्ग), मुख्याध्यापक श्री. एस. ए. जाधव तसेच शिक्षकवर्ग उपस्थित होते.
राष्ट्रीय शिक्षण दिनानिमित्त श्रीमती श्वेता सावंत यांनी “शिक्षण म्हणजे केवळ पुस्तकी ज्ञान नव्हे, तर विद्यार्थ्यांनी चित्रकला, नृत्य, संगीत अशा कलांचाही विकास करावा” असे सांगत शिक्षणाचे व्यापक महत्त्व पटवून दिले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन श्री. जी. एम. गोसावी (सहा. शिक्षक) यांनी केले. या शिबिराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये बालसुरक्षा आणि कायदेविषयक जागरूकता प्रभावीपणे निर्माण झाली.










