जमावबंदी आदेशाचे उल्लंघन..? | १३ जणांसह ८० ते ९० जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Edited by: लवू म्हाडेश्वर
Published on: November 11, 2025 12:46 PM
views 492  views

सिंधुदुर्गनगरी : ओरोस येथे जिल्हाधिकारी यांनी जारी केलेल्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करून मोठ्या संख्येने नागरिकांनी मोर्चा काढल्याप्रकरणी सिंधुदुर्गनगरी पोलिसांनी १३ प्रमुखांसह सुमारे ८० ते ९० जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

ही घटना सोमवार दि. १० नोव्हेंबर रोजी सकाळी ११ ते दुपारी १ वाजेच्या दरम्यान घडली.  ओरोस सिडको सर्कल ते  पोलीस अधीक्षक कार्यालय, सिंधुदुर्ग या मार्गावर बेकायदेशीर जमाव जमवून मोर्चा काढला. यावेळी जिल्हाधिकारी, सिंधुदुर्ग यांनी लागू केलेल्या जमावबंदी आदेशाचे तसेच भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम १६८ च्या नोटिशीचे उल्लंघन करण्यात आले.

या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक सूरज पाटील यांच्या तक्रारीवरून गुन्हा रजिस्टर नं. 66/2025 असा दाखल करण्यात आला आहे. आरोपींवर भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 189(2), 190, 223 तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37(2) व 135 अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

या गुन्ह्यात  संदीप निंबाळकर (रा. सुकळवाड), जयेंद्र परुळेकर (रा. सावंतवाडी), डॉ. सतीश ललित (रा. ओरोस, खरेवाडी), महेश परुळेकर (रा. कुडाळ), इजाज नाईक (रा. कुडाळ), रफिक मेमन (रा. सावंतवाडी), सर्फराज शेख (रा. कुडाळ), मोहन जाधव (रा. कुडाळ), एजाज मुल्ला (रा. कुडाळ), आसिफ शेख (रा. बांदा), अब्दुल रजाक शेख (रा. बांदा), असलम खेडेकर (रा. साटेली भेडशी, दोडामार्ग) व कमलताई परुळेकर (रा. पणदुर, ता. कुडाळ) यांचा समावेश आहे.