
सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात सामाजिक सलोखा टिकून राहावा, तसेच प्रत्येक नागरिकाला संविधानाने दिलेल्या हक्कांनुसार निर्भयपणे व्यवसाय करता यावा, यासाठी समाजात अशांतता पसरविणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी आज सर्वधर्मीय बांधवांनी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा काढला.
अल्पसंख्यांक बांधवांना धमकावणे, त्यांचे व्यवसाय बंद पाडणे आणि समाजमाध्यमांद्वारे द्वेष पसरविण्याचे प्रकार जिल्ह्यात वाढत असल्याबद्दल मोर्चेकऱ्यांनी तीव्र निषेध नोंदविला. या पार्श्वभूमीवर ‘भारतीय’च्या वतीने सर्वधर्मीय नागरिकांनी एकत्र येत प्रशासनाकडे निवेदन सादर केले.
आफताब शेख प्रकरणी SIT चौकशीची मागणी
बांदा येथील फुलविक्रेता आफताब शेख याने झालेल्या आत्महत्येचे कारण झुंडशाहीमुळे निर्माण झालेली आर्थिक कोंडी असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. शेख कुटुंबाने मागील काही महिन्यांपासून पोलीस प्रशासनाकडे तक्रारी केल्या तरी योग्य प्रतिसाद मिळाला नाही, अशी खंत व्यक्त करण्यात आली.
सदर प्रकरणात संबंधित आरोपींना हेतुपुरस्सर विलंब करून अटकपूर्व जामिनाची संधी मिळेल असे वातावरण तयार करण्यात आले, असा आरोप करत या प्रकरणाची निःपक्षपाती चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक (SIT) गठीत करण्याची मागणी करण्यात आली.
दोडामार्ग घटनेत चिथावणीखोर राजकारणाचा आरोप
दोडामार्ग येथे पोलीस तपास सुरू असतानाही काही राजकीय नेते व संघटना आरोपींच्या समर्थनार्थ चिथावणीखोर भाषणे करीत असून, त्यामुळे जिल्ह्यातील बंधुता व सलोखा धोक्यात येत असल्याचा आरोप मोर्चेकऱ्यांनी केला.
पोलीसांनी अशा व्यक्तींवर कोणतीही कारवाई न केल्याने त्या अधिक आक्रमक झाल्या असून, सार्वजनिक ठिकाणी प्राणघातक हत्यारे घेऊन मिरवणुका काढण्याच्या घटना वाढल्या आहेत, असे निवेदनात नमूद आहे.
अल्पसंख्यांक बांधवांना निर्भयपणे व्यवसाय करण्याची मागणी
साटेली-भेडशी, सावंतवाडी आणि बांदा येथे अल्पसंख्यांक समाजातील व्यावसायिकांना अडथळे निर्माण होत असून, स्थानिक स्वराज्य संस्थांमधून संविधानविरोधी ठराव मंजूर केल्याचेही निदर्शनास आणले. अशा घटनांवर तातडीने कारवाई करून संबंधितांना व्यवसाय करण्यास संरक्षण द्यावे, अशी मागणी करण्यात आली.
मोहल्ला समित्या स्थापन करण्याचा प्रस्ताव
जिल्ह्यातील शांतता आणि सदभाव टिकविण्यासाठी प्रत्येक गावात व शहरात मोहल्ला कमिट्या स्थापन करण्याचा प्रस्ताव निवेदनात मांडण्यात आला. या समित्यांमध्ये पोलीस प्रतिनिधींसह सर्व धर्मातील शांतताप्रेमी नागरिकांचा समावेश करावा आणि बैठका दर महिन्याला आयोजित कराव्यात, अशी सूचना देण्यात आली.
सोशल मिडिया पोस्टवर नियंत्रणाची मागणी
समाजमाध्यमांवरून अल्पसंख्यांक समुदायाविरोधात द्वेषपूर्ण पोस्ट, व्हिडिओ किंवा वक्तव्य प्रसारित करणाऱ्या व्यक्तींवर तातडीने कायदेशीर कारवाई करून त्या पोस्ट हटविण्याची प्रक्रिया सुरू करावी, अशी मागणी करण्यात आली.
समानतेच्या तत्वानुसार कारवाई व्हावी
पोलीस प्रशासनाने धर्म वा जात न पाहता गुन्हेगारांवर कठोर कारवाई करावी, अशी भूमिका निवेदनातून स्पष्ट करण्यात आली. “आम्ही देशाचे नागरिक म्हणून कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस व प्रशासनास सर्वतोपरी सहकार्य करू,” असेही मोर्चेकऱ्यांनी स्पष्ट केले.
मोर्चात अनेक मान्यवरांचा सहभाग
या मोर्चात माजी आमदार वैभव नाईक, कमलताई परूळेकर, ॲड. संदीप निंबाळकर, महेश परूळेकर, डॉ. जयेंद्र परूळेकर, मुस्ताक शेख,सतीश लळीत, संजय वेतुरेकर,सरफराज नाईक, इजाज नाईक, रफिक मेमन आदींसह सर्व धर्मीय बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.










