
सिंधुदुर्गनगरी : दोडामार्ग तिलारी येथे गोमांस वाहतुकीच्या संशयावरून झालेली मारहाण व कार जाळपोळ प्रकरणी दोडामार्ग नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांच्यासह उर्वरित अकराही जणांना येथील जिल्हा न्यायाधीश एक व अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही. एस. देशमुख यांनी सशर्त जामीन मंजूर केला आहे.
दोडामार्ग नगराध्यक्ष चेतन सुभाष चव्हाण, भाजपा मंडळ प्रमुख दीपक उर्फ रामा दशरथ गवस आणि प्रदीप लवू गावडे यांच्या वतीने वकील संग्राम देसाई आणि सुहास साटम यांनी काम पाहिले तर महेंद्र गंगाराम खरवत, वैभव वसंत रेडकर, विजय तारक कांबळे, विशाल सुभाष चव्हाण, आनंद अंकुश तळणकर, पराशर जगन्नाथ सावंत, गणपत पुरुषोत्तम डिंगणे कर, जयदेव उर्फ राज आनंद काळबेकर यांच्यावतीने वकील उमेश सावंत यांनी काम पाहिले.
तिलारी येथे गोमांस वाहतूक करीत असल्याच्या संशयावरून काहींनी एकाला बेदम मारहाण करून त्याची कार जाळल्याची घटना २५ सप्टेंबर रोजी घडली होती. मारहाण झालेल्या व्यक्तीला त्याच्या कार सहित एक पोलीस कर्मचारी वरिष्ठांच्या आदेशानुसार पुढील कार्यवाही करण्यासाठी त्याला येथील पोलीस ठाण्यात आणत असताना हा प्रकार घडला होता. या पोलीस कर्मचाऱ्याच्या फिर्यादीवरून ५० ते ६० युवकांवर पोलिसांनी गुन्हा दाखल करून यातील १६ संशयित आरोपींना ताब्यात घेतले होते. यातील ५ जणांना या पूर्वी जामीन मंजूर झाला होता.
उर्वरित ११ जण अजूनही न्यायलईन कोठडीत होते. बुधवारी दोषारोप पत्र दाखल झाल्यानंतर उर्वरित अकरावी जणांनी आपल्याला जामीन मंजूर व्हाव्यासाठी अर्ज केला होता त्यामध्ये चेतन सुभाष चव्हाण, दीपक उर्फ रामा दशरथ गवस आणि प्रदीप लवू गावडे, महेंद्र गंगाराम खरवत, वैभव वसंत रेडकर, विजय तारक कांबळे, विशाल सुभाष चव्हाण, आनंद अंकुश तळणकर, पराशर जगन्नाथ सावंत, गणपत पुरुषोत्तम डिंगणेकर, जयदेव उर्फ राज आनंद काळबेकर यांचा समावेश आहे.










