प्रशासकीय कामासह शेती आणि आरोग्य क्षेत्रातही एआयचा वापर :

ग्रामपंचायतींनी औषधांसाठी निधी तरतूद करावी : खेबुडकर
Edited by: लवू म्हाडेश्वर
Published on: November 07, 2025 10:52 AM
views 13  views

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेने कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) प्रणालीचा वापर केवळ प्रशासनिक कामापुरता मर्यादित न ठेवता तो शेती आणि आरोग्य क्षेत्रातही विस्तारण्याचा निर्णय घेतला आहे. एआय प्रणालीच्या माध्यमातून हळद लागवड व त्यावरील प्रक्रिया केली जाणार आहे तसेच ग्रामपंचायतींनी औषध खरेदीसाठी निधीची तरतूद करावी अशा सूचना दिल्या असल्याची माहिती जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी रविंद्र खेबुडकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

जिल्हा परिषद छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) प्रणाली बाबत माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी हळद लागवड आणि प्रोसेसिंग युनिट उभारणीसाठी २१ लाखांची तरतूद करण्यात आली असून, हळद लागवडीसाठी एआय प्रणालीच्या मदतीने मातीची गुणवत्ता, हवामान आणि उत्पादनाचा अंदाज याचा अभ्यास केला जाणार आहे. दरम्यान, आरोग्य विभागाने एआय प्रणालीच्या माध्यमातून केलेल्या अभ्यासात मधुमेह आणि उच्च रक्तदाबाच्या रुग्णसंख्येत वाढ होत असल्याचे निदर्शनास आले आहे. काही आरोग्य केंद्रांकडून या आजारांच्या औषधांची मागणी वाढत असून, त्यांना आवश्यक औषधांचा पुरवठा करण्यात येणार आहे.

ग्रामीण भागातील नागरिकांना औषधांचा तुटवडा भासू नये म्हणून प्रत्येक ग्रामपंचायतीने आपल्या गावातील नागरिकांसाठी औषध उपलब्धतेसाठी निधीची तरतूद करावी, अशा सूचना जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांनी दिल्या आहेत.

जिल्हा परिषदेत सुरू असलेल्या एआय प्रणालीमुळे कामकाजाची गती वाढली असून, कर्मचाऱ्यांचे तास कमी झाले आहेत. आतापर्यंत ७२२ कर्मचाऱ्यांना एआयचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. नीती आयोगाच्या सदस्यांनीही या प्रणालीची पाहणी करून समाधान व्यक्त केले आहे.