
सिंधुदुर्गनगरी : कोकण रेल्वे प्रवासी समन्वय संघटनेच्या सातत्यपूर्ण मागणीनंतर जिल्हा मुख्यालय असलेल्या सिंधुदुर्ग रेल्वे स्टेशनवर अखेर एनराकूलम-अजमेर मरुसागर एक्सप्रेस या साप्ताहिक जलदगाडीला थांबा मंजूर करण्यात आला आहे. या निर्णयानंतर सोमवारी पहिल्यांदाच सिंधुदुर्ग स्टेशनवर दाखल झालेल्या मरुसागर एक्सप्रेसचे भव्य स्वागत करण्यात आले.
गाडी स्टेशनवर दाखल होताच कोकण रेल्वे प्रवासी समन्वय व संघर्ष समिती, सिंधुदुर्ग रेल्वे स्टेशन संघटना, दशक्रोशीतील सरपंच व प्रवासी नागरिकांच्या वतीने मोटरमन, स्टेशन मास्टर आणि गार्ड यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. त्यानंतर गाडीला हार, श्रीफळ अर्पण करून टाळ्यांच्या गजरात स्वागत करण्यात आले. या प्रसंगी समितीचे अध्यक्ष प्रकाश पावसकर, सचिव अजय मयेकर, जिल्हा समन्वयक नंदन वेंगुर्लेकर, उपाध्यक्ष परशुराम परब, कार्याध्यक्ष शुभम परब, स्टेशन संघटनेचे अध्यक्ष आप्पा मांजरेकर, सचिव सुमित सावंत, सरपंच राजन परब, लता खोत, साई आंबेरकर, तसेच दशक्रोशीतील नागरिक, सामाजिक कार्यकर्ते आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सिंधुदुर्ग स्टेशन हे जिल्हा मुख्यालयाचे प्रमुख स्टेशन असून येथे जलद गाड्यांना थांबा देण्याची मागणी गेल्या काही वर्षांपासून सुरू होती. या मागणीसाठी कोकण रेल्वे प्रवासी संघर्ष समितीने सातत्याने जनआंदोलन करून रेल्वे प्रशासनाचे लक्ष वेधले होते. तसेच खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे व आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून रेल्वेमंत्र्यांकडे पाठपुरावा करण्यात आला. या प्रयत्नांनंतर रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव, कोकण रेल्वे रिजनल मॅनेजर शैलेश बापट आणि कोकण रेल्वे बोर्डाने सिंधुदुर्ग स्टेशनवर मरुसागर एक्सप्रेसला थांबा मंजूर केला आहे.
ही गाडी आज दुपारी १.२० वाजता सिंधुदुर्ग स्टेशनवर दाखल झाली. पुढील ६ नोव्हेंबर रोजी सायं ७ वाजता एनराकूलम–हजरत निजामुद्दीन गाडीही स्टेशनवर येणार असून तिचेही स्वागत करण्याचे ठरविण्यात आले आहे. बैठकीत पुढील विविध मागण्यांवरही चर्चा झाली. स्टेशनकडे जाणारे रस्ते सुधारावेत, फाटकांऐवजी उड्डाणपूल उभारावेत, जनशताब्दी आणि नेत्रावती गाड्यांना येथे थांबा मिळावा, स्टेशनचे प्रवेशद्वाराचे काम पूर्ण व्हावे तसेच पीआरएस तिकीट सुविधा अधिक बळकट करावी, अशी मागणी समितीने केली. तसेच स्टेशनच्या सुशोभीकरणासाठी ग्रामपंचायतींनी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले.
जिल्हाध्यक्ष प्रकाश पावसकर यांनी सांगितले की, "हा सातत्याने केलेल्या पाठपुराव्याचा आणि जनआंदोलनाचा विजय आहे. अजूनही वैभववाडी, नांदगाव, मडूर या स्थानकांवरील जलद गाड्यांच्या थांब्यांचा पाठपुरावा सुरूच आहे." जिल्हा समन्वयक नंदन वेंगुर्लेकर यांनी कोकण रेल्वेच्या सिंधुदुर्गातील दहा स्टेशनच्या सुशोभीकरण, पीआरएस तिकीट केंद्र वाढविणे आणि रेल्वे दुपदरीकरणासाठी होत असलेल्या प्रयत्नांची माहिती दिली. उपस्थितांचे आभार जिल्हा सचिव अजय मयेकर यांनी मानले.










