
सिंधुदुर्गनगरी : जलजीवन मिशन अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी प्राप्त झालेला निधी अद्याप वितरीत न केल्यामुळे महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाच्या वतीने मंगळवारी (४ नोव्हेंबर) ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंता यांच्या दालनासमोर तीव्र आंदोलन छेडण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.
महासंघाच्या वतीने कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सन २०२२-२३ पासून सुरू झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी "हर घर जल" योजनेअंतर्गत जिल्ह्यात तब्बल ४५६ कोटी रुपयांची कामे हाती घेण्यात आली असून त्यापैकी सुमारे ७० टक्के कामे पूर्ण झाली आहेत. मात्र आतापर्यंत केवळ १७१.६९ कोटी रुपयांचा म्हणजेच ३८ टक्के इतकाच निधी वितरित करण्यात आला आहे.
गेल्या दीड वर्षांपासून अपुरा निधी मिळत असल्यामुळे ठेकेदार, कामगार तसेच साहित्य आणि मशिनरी पुरवठादार आर्थिक संकटात सापडले आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य पाणीपुरवठा संघटनेचे अध्यक्ष मिलिंद भोसले यांनी शासनाशी सातत्याने पाठपुरावा केला. त्यानंतर मुख्यमंत्री यांच्या हस्तक्षेपामुळे राज्य शासनाकडून सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी रु. ७.६६ कोटी निधी १७ ऑक्टोबर २०२५ रोजी मंजूर करण्यात आला.
परंतु, या निधीचे वितरण अद्याप न झाल्यामुळे ठेकेदारांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. “सोमवार (३ नोव्हेंबर) पर्यंत हा निधी वितरित न झाल्यास मंगळवार, ४ नोव्हेंबर रोजी ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात येईल,” असा इशारा महासंघाने दिला आहे. या निवेदनावर संस्थेचे अध्यक्ष दिलीप सावंत, उपाध्यक्ष विलास गवस, उदयकुमार पाटील, प्रसाद कुलकर्णी आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.










