बालकवींच्या कवितांचा शतकानंतरही तोच ताजेपणा

‘बालकवी : एक शापित गंधर्व’ कार्यक्रमात विचार मांडणी
Edited by:
Published on: November 03, 2025 14:41 PM
views 50  views

सिंधुदुर्गनगरी : निसर्गचित्रे, निरागस बालविश्व आणि गूढभावना या तिन्ही मराठी कवितेच्या प्रवाहांमध्ये विलक्षण सहजतेने फिरणाऱ्या बालकवींच्या प्रतिभेचा आजही ताजेपणा ओसरलेला नाही. अवघ्या २८ वर्षांचे अल्पायुष्य असतानाही त्यांनी मराठी साहित्याला दिलेले काव्यसौंदर्य आज शतकानंतरही तितक्याच प्रेमाने जपले जात आहे, असे मत निवृत्त माहिती उपसंचालक सतीश लळीत यांनी व्यक्त केले.

‘घुंगुरकाठी’ प्रणित ‘आम्ही साहित्यप्रेमी’ या व्यासपीठाच्या आठव्या मासिक कार्यक्रमात ‘बालकवी : एक शापित गंधर्व’ हा विशेष कार्यक्रम ओरोस येथील दत्तराज सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या सांस्कृतिक सभागृहात रंगला. सुरुवातीला मालवणी रंगभूमीला विशेष ओळख देणारे नाटककार गंगाराम गवाणकर यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. दीड तास चाललेल्या या कार्यक्रमात प्रिया आजगावकर, मनोहर सरमळकर, डॉ. सई लळीत, प्रगती पाताडे, वैदेही आरोंदेकर, नम्रता रासम, अपर्णा जोशी व ॲड. सुधीर गोठणकर यांनी मनोगत मांडले.

लळीत यांनी बालकवींच्या काव्यप्रवासाचा मागोवा घेताना सांगितले की १९०७ साली जळगाव येथे ‘काव्यरत्नावलीकार’ नानासाहेब फडणीस यांनी आयोजित केलेल्या पहिल्या कविसंमेलनात फक्त १७ वर्षांच्या बालकवींच्या सादरीकरणाने तत्कालीन दिग्गजांचेही लक्ष वेधले. त्याच ठिकाणी ‘बालकवी’ ही पदवी कर्नल का. र. कीर्तिकर यांच्या हस्ते त्यांना देण्यात आली. निसर्गकविता, बालकविता आणि ‘औदुंबर’सारखी तत्त्वचिंतनात्मक कविता या सर्वांवर त्यांची बरोबरी नसल्याचे त्यांनी नमूद केले.

डॉ. सई लळीत यांनी बालकवींचे रेव्हरंड ना. वा. टिळक व लक्ष्मीबाई टिळक यांच्याशी असलेले जिव्हाळ्याचे नाते सांगत त्यांच्या खोडकर स्वभावाची अनेक उदाहरणे रसिकांसमोर ठेवली.

मनोहर सरमळकर यांनी ‘औदुंबर’ या कवितेचे निसर्गाच्या दृष्टीने रसग्रहण केले, तर ॲड. सुधीर गोठणकर यांनी त्याच कवितेत दडलेला अध्यात्मिक अर्थ स्पष्ट करत निसर्गाच्या रूपकांतून जीवनतत्त्वाचा शोध बालकवी घेतात, असे मत व्यक्त केले.

नम्रता रासम यांनी बालकवी हे “मराठी कवितेला पडलेले स्वप्न” असल्याचे सांगितले. निरागसता, भीती, खिन्नता आणि निसर्गातील सूक्ष्मता या सर्वांचे अनोखे मिश्रण त्यांच्या कवितांमध्ये आढळते, असे त्यांनी नमूद केले. वैदेही आरोंदेकर यांनी ‘घरटे’ कवितेचे स्पष्टीकरण करत चिमणीच्या स्वातंत्र्यनिवडीतील काव्यदर्शन मांडले.

या कार्यक्रमात प्रिया आजगावकर यांनी ‘आनंदी आनंद गडे’, अपर्णा जोशी यांनी ‘श्रावणमास’ आणि प्रगती पाताडे यांनी ‘उदासीनता’ या कविता सादर केल्या. संपूर्ण कार्यक्रमाला रसिकांची उत्स्फूर्त दाद मिळाली.