नीती आयोगाचं शिष्टमंडळ जिल्ह्यात दाखलं

देशातील पहिला AI प्रणाली राबविणारा जिल्हा ठरला सिंधुदुर्ग
Edited by: लवू म्हाडेश्वर
Published on: October 30, 2025 14:11 PM
views 281  views

सिंधुदुर्गनगरी : देशात आणि राज्यात कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) प्रणाली प्रभावीपणे राबविणारा पहिला जिल्हा म्हणून सिंधुदुर्गने ऐतिहासिक मान पटकावला आहे. या उपक्रमाची दखल स्वतः देशाच्या नीती आयोगाने घेतली असून, आयोगाचे शिष्टमंडळ आज दोन दिवसांच्या अभ्यास दौऱ्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल झाले आहे.

या दौऱ्याच्या निमित्ताने जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी नीती आयोगाच्या सदस्यांचे स्वागत केले. यावेळी जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या AI प्रणालीची संपूर्ण माहिती व सादरीकरण आयोगाच्या सदस्यांना देण्यात आले.

नीती आयोगाचे सदस्य आज 30 आणि उद्या 31 ऑक्टोबर या दोन दिवसांत जिल्ह्यातील विविध शासकीय विभागांमध्ये प्रत्यक्ष पाहणी करून AI प्रणालीच्या कार्यप्रणालीचा सखोल अभ्यास करणार आहेत.

या अभ्यास दौऱ्यानंतर नीती आयोगाकडून तयार करण्यात येणारा अहवाल थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सादर केला जाणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याने कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून शासकीय कामकाज पारदर्शक, जलद आणि नागरिकाभिमुख करण्याच्या दिशेने देशात नवा आदर्श निर्माण केला आहे. हा तंत्रज्ञानाधारित प्रयोग आता देशभरातील प्रशासनासाठी प्रेरणादायी ठरणार आहे.