शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्याची मागणी

Edited by: लवू म्हाडेश्वर
Published on: October 27, 2025 19:08 PM
views 187  views

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या दहा दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे भात व नाचणी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर छत्रपती शिवाजी महाराज सिंधुदुर्ग जिल्हा शेतकरी संघटनेने शासनाकडे जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करून सर्व शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्याची मागणी केली आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे. 

अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे. जिल्ह्यातील अनेक भागात भातपिकाची कापणी सुरू असतानाच पडत असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. नाचणीसारख्या पिकांनाही फटका बसला असून शेतकऱ्यांचे उत्पन्न घटले आहे. या पार्श्वभूमीवर शासनाने परिस्थितीचा गांभीर्याने विचार करून सिंधुदुर्ग जिल्ह्याला अतिवृष्टीग्रस्त जिल्ह्यांच्या धर्तीवर मदत जाहीर करावी, अशी मागणी संघटनेने केली आहे. “अवकाळी पावसाचा फटका पुढील रब्बी हंगामावर होणार असल्याने शेतकरी पूर्णतः संकटात सापडला आहे,” असे संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाला दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे.

अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या आशा भिजल्या असून, शासनाने जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करून सर्व शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्याची मागणी केली आहे. तसेच शासनाकडून तातडीचा दिलासा मिळावा, अशी अपेक्षा जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये आहे. आपल्या मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. यावेळी संघटनेचे अध्यक्ष शामसुंदर राय, महेश चव्हाण, प्रकाश वारंग, यशवंत तेली, कृष्णा परब, सचिन मुळीक, प्रदीप सावंत, उत्तम नाईक, सुभाष भगत, प्रल्हाद राणे यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते.