नव्या महसूल गावासाठी अधीसूचना जाहीर

ओरोस रानबांबुळी व अणाव या तीन गावांचा होणार समावेश | नागरिकांना हरकती व सूचना घेण्यासाठी २९ ऑक्टोबर पर्यंत मुदत
Edited by: लवू म्हाडेश्वर
Published on: October 25, 2025 11:08 AM
views 203  views

सिंधुदुर्गनगरी :  ओरोस रानबांबुळी व अणाव या तीन गावांच्या नगरपंचायती साठी प्रशासकीय हालचाली सुरू झाल्या आहेत. पालकमंत्री नितेश राणे यांनी लवकरात लवकर ही नगरपंचायत करणार असल्याचे जाहीर केले होते.  या तीन गावांचा एकत्रित समावेश करत सिंधुदुर्गनगरी हे नवीन महसुली गाव जिल्हाधिकारी श्रीमती तृप्ती धोडमिसे  यांनी प्रारूप अधिसूचनेद्वारे जाहीर केले आहे. 

कुडाळ तालुक्यातील सिंधुदुर्गनगरी हे महसुली गाव जाहीर करण्याबाबत सिंधुदुर्ग जिल्हाधिकाऱ्यांनी प्रारूप अधिसूचना जाहीर केली आहे. या अधिसूचनेबाबत कोणाच्या हरकती व सूचना असतील तर 29 ऑक्टोबर 2025 पर्यंत त्या लेखी स्वरूपात तहसीलदार कुडाळ किंवा उपविभागीय अधिकारी कुडाळ यांचे कार्यालयात सादर कराव्यात असे आवाहन करण्यात आले आहे. 

ओरोस बुद्रुक मुळ गाव भूमापन क्रमांक २५४, रानबांबुळी मूळ  गाव एकूण भूमापन क्रमांक १५६, अनाव मुळ गाव एकूण भूमापन क्रमांक २६५ व सिंधुदुर्ग नगरी प्रस्तावित एकूण भूमापन क्रमांक ३ अशा एकूण ६७८ भूमापन क्रमांक समाविष्ट असलेला सिंधुदुर्ग नगरी हा महसुली गाव जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यानी प्रारूप अधिसूचनेद्वारे जाहीर केला आहे.