जिल्हाधिकारी - पोलिस अधीक्षकांची बालगृहातील बालकांसमवेत दिपावली

Edited by: लवू म्हाडेश्वर
Published on: October 17, 2025 19:41 PM
views 57  views

सिंधुदुर्गनगरी : जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे आणि पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर यांनी आज बालगृहातील बालकांसोबत दिवाळी साजरी केली. बालगृहातील काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या बालकांच्या समवेत कुटुंबाप्रमाणे दिवाळी सण साजरा करताना जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी बालगृहातील बालकांना बाहेरच्या जगाचा अनुभव घेवून आयुष्य चांगल्या पध्दतीने व यशस्वी रित्या जगण्याची प्रेरणा देवुन बालकांना दिपावलीच्या शुभेच्छा दिल्या.

तसेच पोलीस अधिक्षक डॉ. मोहन दहिकर यांनी बालगृहामध्ये राहण्याकडे एक संधी म्हणून पाहुन संधीचे सोने करण्यासाठीचा संदेश दिपावली सणानिमित्त बालगृहातील बालकांना दिला. तसेच बालकांच्या शैक्षणिक विकासाकरीता आवश्यक मदत करण्याची ग्वाही देखील त्यांनी दिली. 

यासोबतच जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव संपुर्णा गुंडेवाडी  यांनी दिपावली निमित्त बालकांना आकाशात गरुड होवून जगण्याची दिशा देत स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी ' स्काय इज लिमीट' मानुन अभ्यास करुन यश मिळविण्यासाठीचा संदेश दिला. उपस्थित मान्यावरांनी बालगृहातील बालकांच्या समवेत दिपावलीचा सण मोठ्या आनंदाने संस्थेत साजरा करून दिपावली सणाचा आनंद घेतला व संस्थेतील बालके व कर्मचारी त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी मान्यवरांनी बालकांच्या सोबत दिपावली फराळ करुन मुलांचा आनंद व्दिगुणीत केला.

यावेळी बाल कल्याण समिती सदस्य ए.जी. पणुदरकर, प्रा. अमर निर्मळे, प्रा. माया रहाटे, नम्रता नेवगी, बाल न्याय मंडळाचे सदस्य, के. के. कुबल, माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी नितीन काळे, जिल्हा क्रिडा विभागाचे श्री. गायकवाड, आरोग्य विभागाचे डॉ. सवदी, संस्था व्यवस्थापन समितीचे सदस्य, प्रा. सुभाष बांबुळकर, भरोसा सेलच्या सहा. पोलीस निरीक्षक नलिनी शिंदे तसेच विशेष बाल पोलीस पथकाचे सदस्य, त्याचबरोबर महिला बाल विभागाकडील जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, बापु शिणगारे, बाल विकास प्रकल्प अधिकारी, प्रतिक उगारे, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी, विश्वनाथ कांबळी, इत्यादी अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

दिपावली सण संस्थेमध्ये बालकांच्या करीता मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. संपुर्ण कार्यक्रमाचे नियोजन संस्था अधिक्षक बी. जी. काटकर यांनी करुन उपस्थितांचे आभार मानले