
सिंधुदुर्गनगरी : जिल्हा परिषद प्रशासनाच्या वतीने खास दीवाळी सणानिमित्त आयोजित खाद्य पदार्थ व वस्तुंच्या स्टॉलचे उद्घाटन आज जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या हस्ते झाले.या वेळी जिल्हापरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर हे उपस्थित होते.
दिवाळी सणा निमित्त आवश्यक खाद्यपदार्थ व वस्तूंच्या विक्रीचे प्रदर्शन जिल्हा परिषद परिसरामध्ये १३ ऑक्टोबर ते १७ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत आयोजित करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत ग्रामीण भागातील कार्यरत स्वयं सहाय्यता समूहांनी उत्पादित केलेल्या मालास स्थानिक बाजारपेठ मिळवून देण्याच्या उद्देशाने तसेच स्वयं सहाय्यता समूहांना प्रोत्साहित करण्याच्या उद्देशाने दीपावली सणाचे निमित्त साधून जिल्हा परिषद सिंधुदुर्ग व उमेद अभियानामार्फत दीपावली सणाकरिता आवश्यक साहित्य, आकाश कंदील, फराळ, मिठाई व विविध वस्तूंच्या विक्रीचे प्रदर्शन १३ ऑक्टोबर ते १७ ऑक्टोबर २०२५ या कालावधीमध्ये जिल्हा परिषद सिंधुदुर्ग कार्यालयाच्या परिसरामध्ये आयोजित करण्यात आले आहे.
सदरच्या प्रदर्शन व विक्री स्टॉलचे उद्घाटन आज जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या हस्ते व जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर यांच्या प्रमुख उपस्तितित झाले . यावेळी उप मुख्य कार्यकारी अधिकारी जयप्रकाश परब ,जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रकल्प संचालक उदय पाटील, यांच्यासह जिल्हा परिषद खातेप्रमुख , कर्मचारी मोठ्या संखेने उपस्थित होते , यावेळी बोलताना रवींद्र खेबुडकर यांनी सर्व अधिकारी कर्मचाऱ्यानी प्रदर्शनाला भेट देऊन तसेच खाद्यपदार्थ खरेदी करून बचतगटाना प्रोत्साहन द्यावे . असे आवाहन केले .तर जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी बचत गटानी उत्पादित केलेल्या मालाची पाहणी करत बचत गटांचे कौतुक केले तर बचत गटांना कायमस्वरूपी रोटेशन पद्धतीने स्टॉल उपलब्ध करून दिल्यास त्यांनी उत्पादित केलेल्या मालाची मोठ्या प्रमाणात विक्री होऊ शकेल त्या दृष्टीने जिल्हा परिषद प्रशासनाने प्रयत्न करावेत व उत्पादित मालाच्या प्रचार प्रसिद्धीवर भर द्यावा अशी सूचना केली.










