सहकार मंत्र्यांकडून शेतकऱ्यांचा अपमान | जिल्हा काँग्रेसकडून निषेध

Edited by: लवू म्हाडेश्वर
Published on: October 12, 2025 13:45 PM
views 149  views

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसच्या वतीने जिल्हा अध्यक्ष इर्शाद शेख यांनी सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या शेतकऱ्यांबाबत केलेल्या निर्लज्ज, असंवेदनशील आणि अमानुष वक्तव्याचा तीव्र शब्दांत जाहीर निषेध केला आहे. शेतकऱ्यांना “कर्जमाफीचा नाद लागलाय” आणि “आम्हाला निवडून यायचे असते म्हणून आम्ही आश्वासन देतो, पण काय मागणी करायची हे शेतकऱ्यांनी समजून घेतले पाहिजे” अशा प्रकारचे वक्तव्य हे केवळ राजकीय बेफिकिरी नव्हे, तर शेतकऱ्यांच्या वेदनेची चेष्टा करणारे आहे, असे इर्शाद शेख यांनी म्हटले आहे

शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारे वक्तव्य

आज महाराष्ट्रातील शेतकरी सर्वांत कठीण काळातून जात आहे. वारंवार होणारे पावसाचे अनियमित चक्र, वाढते उत्पादनखर्च, बाजारात योग्य भाव न मिळणे आणि कर्जाच्या जाळ्यात अडकलेले आयुष्य ही शेतकऱ्यांची वास्तव परिस्थिती आहे. अशा परिस्थितीत सत्ताधारी पक्षाचे सहकार मंत्री शेतकऱ्यांच्या कर्जमाफीविषयी टवाळी करणारे वक्तव्य करतात, हे सरकारच्या असंवेदनशीलतेचे स्पष्ट उदाहरण आहे.

अशा शब्दांनी शेतकऱ्यांची केवळ खिल्ली उडवली जात नाही, तर त्यांच्या संघर्षाचा अपमान होतो. सरकारचे अपयश झाकण्यासाठी शेतकऱ्यांवर दोष टाकणे, शेतकऱ्यांवर संकट कोसळण्याचे मुख्य कारण म्हणजे केंद्र आणि राज्य सरकारची चुकीची धोरणे.

उत्पादन खर्चात प्रचंड वाढ झाली आहे, पण पिकांना हमीभाव मिळत नाही. शेतीसाठी लागणारी वीज, खतांचे भाव आणि बियाण्यांचे दर आभाळाला भिडले आहेत. नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान भरपाईच्या फक्त घोषणा होतात पण प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचेच काम केले जाते.

शेतकऱ्यांच्या सद्यपरिस्थितीला जबाबदार असलेले सरकार आणि त्यांचे मंत्री आता शेतकऱ्यांनाच दोष देतात, हे अत्यंत संतापजनक आहे.

जनतेशी विश्वासघात करणारे सत्ताधारी

मंत्री महोदयांचे वक्तव्य हे जनतेच्या विश्वासाचा संपूर्ण विश्वासघात आहे. निवडणुकीच्या वेळी शेतकऱ्यांना कर्जमाफी, भरघोस मदत, शेतीला हमीभाव, रोजगार यांची आश्वासने देऊन मत मागितले जातात. परंतु सत्तेवर आल्यानंतर ती आश्वासने पूर्ण करण्या ऐवजी अशी असंवेदनशील वक्तव्य करताना या मंत्री महोदयाना लाज सुद्धा कशी वाटत नाही. मंत्री स्वतः कबूल करतात की ती आश्वासने “फक्त निवडणुकीसाठी होती”. हा स्वीकार म्हणजे जनतेची फसवणूक, शेतकऱ्यांचा आणि लोकशाहीचा अपमान करणारी कबुली आहे.

काँग्रेसचा ठाम निषेध आणि इशारा

काँग्रेस पक्ष अशा असंवेदनशील आणि शेतकरीविरोधी वक्तव्याचा तीव्र निषेध करतो. सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांची मंत्रीमंडळातून हकालपट्टी करावी. अशी आमची ठाम मागणी आहे. जर सरकारने या वक्तव्याकडे दुर्लक्ष केले, तर काँग्रेस पक्ष राज्यभर आंदोलन उभारेल आणि शेतकऱ्यांचा आवाज रस्त्यावर उतरवेल.

शेतकऱ्यांच्या हक्कासाठी काँग्रेस लढत राहील

काँग्रेस पक्ष नेहमीच शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा राहिला आहे आणि पुढेही राहील. शेतकऱ्यांना न्याय, कर्जमाफी, हमीभाव आणि सन्मानपूर्वक जीवन मिळवून देण्यासाठी काँग्रेसचा लढा सुरू राहील. शेतकरी हा देशाचा कणा आहे, आणि त्याचा सन्मान राखणे हे प्रत्येक सरकारचे कर्तव्य आहे.