दीक्षा बागवे खून प्रकरणातील आरोपीला कडक शिक्षा व्हावी

बागवे कुटुंबियांची पोलिस अधिक्षकांकडे मागणी
Edited by: लवू म्हाडेश्वर
Published on: October 10, 2025 17:52 PM
views 378  views

सिंधुदुर्गनगरी : दीक्षा बागवे खून प्रकरण ही सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी अत्यंत दुर्दैवी घटना आहे. यातील . आरोपीला कठोरात कठोर शिक्षा झाली तरच असे कृत्य करण्याची कोणाची हिंमत होणार नाही. याप्रकरणी सखोल तपास करून आरोपीला कडक शिक्षा मिळण्यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी माजी आमदार वैभव नाईक व बागवे कुटुंबियांनी  सिंधुदुर्ग जिल्हा पोलिस अधिक्षक मोहन दहीकर यांच्याकडे केली आहे.

कुडाळ तालुक्यातील घावनळे येथील सतरा वर्षीय दीक्षा बागवे या युवतीचा निर्घृण खून करण्यात आला असून संशयित आरोपी कुणाल कृष्णा कुंभार (रा. गोठोस मांडशेतवाडी) याने खुनाची कबुली दिली आहे. याप्रकरणी बागवे कुटूंबियांनी मा.आ.वैभव नाईक यांची भेट घेऊन आपली कैफियत मांडली तसेच गुरुवारी माजी आमदार वैभव नाईक यांच्या समवेत दीक्षा बागवे हिची बहिण प्रतिमा बागवे व योगेश कुबल यांनी सिंधुदुर्ग जिल्हा पोलिस अधिक्षक मोहन दहीकर यांची भेट घेत पोलिस तपासाबाबत माहिती घेण्यात आली.याप्रसंगी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कुडाळ तालुकाप्रमुख राजन नाईक उपस्थित होते.