जिल्हा बँकेच्या ७३ जागांसाठी ५०७७ उमेदवारांकडून अर्ज

लिपिक भरतीसाठी जिल्हा बँकेकडून प्रशिक्षण नोंदणीसाठी आवाहन
Edited by: लवू म्हाडेश्वर
Published on: October 07, 2025 18:33 PM
views 1316  views

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या लिपिक पदभरतीसाठी तब्बल ५०७७ उमेदवारांकडून अर्ज प्राप्त झाले असून, आता या उमेदवारांना परीक्षेपूर्व मार्गदर्शनासाठी विनामूल्य प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. इच्छुक उमेदवारांनी १० ऑक्टोबरपूर्वी प्रशिक्षणासाठी ऑनलाईन नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा बँकेचे अध्यक्ष  मनीष दळवी यांनी आज पत्रकार परिषदेत केले. 

जिल्हा बँकेच्या सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी बँकेचे सीईओ प्रमोद गावडे, संचालक महेश सारंग, व्हिक्टर डान्टस आदी उपस्थित होते. यावेळी मनीष दळवी म्हणाले की, बँकेच्या लिपिक या श्रेणीतील ७३ रिक्त पदे सरळ सेवा पद्धतीने भरावयाची असून, ही भरती प्रक्रिया आय.बी.पी.एस. (इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन) या संस्थेमार्फत राबविण्यात येत आहे. अर्ज भरण्याची मुदत ५ जानेवारी ते ४ ऑक्टोबर २०२५ अशी होती. या कालावधीत ७३ जागांसाठी ५०७७ उमेदवारांनी अर्ज केले असल्याचे श्री. दळवी यांनी यावेळी सांगितले.

प्रशिक्षणासाठी नोंदणी करा

जिल्ह्यात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनासाठी पुरेशा सोयी उपलब्ध नसल्याने, स्थानिक उमेदवारांना लाभ व्हावा या हेतूने बँकेच्या संचालक मंडळाने हा प्रशिक्षण उपक्रम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्या उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज केले आहेत त्यांनी www.sindhudurgdcc.com या संकेतस्थळावर प्रशिक्षणासाठी स्वतंत्र नावनोंदणी करणे आवश्यक आहे. त्यावेळी उमेदवारांनी आपला वॉट्सॲप क्रमांक व परीक्षा अर्ज नोंदणी क्रमांक नमूद करावा. नोंदणी केलेल्या उमेदवारांना १३ ऑक्टोबरपासून बॅचेसनुसार टप्प्याटप्प्याने प्रशिक्षण देण्यात येणार असून, प्रशिक्षणाच्या तारखांची माहिती उमेदवारांना एसएमएस व वॉट्सअॅप संदेशाद्वारे कळविण्यात येईल. जिल्ह्यातील सर्व पात्र उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन बँकेतर्फे करण्यात आले आहे.

त्याला बँक जबाबदार असणार नाही

जिल्हा बँक भरतीसाठी कोणी पैसे मागत असल्यास त्यावर विश्वास ठेऊ नये. आर्थिक व्यवहारातून बँकेत भरती केली जाणार नाही. त्यामुळे उमेदवारांनी आर्थिक अमिषाला.बळी पडू नये असे आवाहन करतानाच उमेदवारांची फसवणूक झाल्यास त्याला बँक किंवा संचालक मंडळ जबाबदार राहणार नसल्याचे बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी यावेळी स्पष्ट केले.