
सिंधुदुर्गनगरी : राज्यातील 247 नगरपरिषद आणि 147 नगरपंचायतींच्या नगराध्यक्ष पदां साठी आरक्षण सोडत प्रक्रिया सोमवारी मंत्रालयात झाली असून, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकूण दोन नगरपरिषद आणि सहा नगरपंचायत यांच्या नगराध्यक्ष पदाचे आरक्षण निश्चित झाले आहे. या आरक्षणा नुसार मालवण नगरपंचायत आणि सावंतवाडी नगर परिषदेवर महिलाराज निश्चित झाली आहेत.तर कणकवली नगरपरिषद नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी राखीव आहे. उर्वरित सर्व खुल्या प्रवर्गासाठी राखीव करण्यात आल्या आहेत.
राज्याच्या नगर विकास राज्यमंत्री श्रीमती माधुरी मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालय मुंबई येथे राज्यातील २४७ नगरपरिषद आणि १४७ नगरपंचायतींच्या नगराध्यक्ष पदांच्या आरक्षणाबाबत सोडत काढण्यात आली. या सोडतीनुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी आणि वेंगुर्ला या दोन नगरपरिषदा आणि मालवण,कणकवली, कसई दोडामार्ग,कुडाळ, देवगड जामसंडे आणि वाभवे वैभववाडी या सहा नगरपंचायत यांच्या नगाराध्यक्षपदांची आरक्षण सोडत निश्चित झाली आहे.
राज्यभरातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका न झाल्याने या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांवर आतापर्यंत प्रशासकीय कारभार होता. गेली सुमारे तीन वर्ष ही स्थिती अशीच आहे. मात्र न्यायालयाने या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जानेवारी 2026 च्या अगोदर घेण्याचे निर्देश दिले असल्याने या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची प्रक्रिया सुरू झाली आहे. राज्यातील सर्व जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या आरक्षण सोडत झाल्यानंतर सोमवारी राज्यातील सर्व नगरपरिषद आणि नगरपंचायत यांच्या नगराध्यक्ष पदांसाठी आरक्षण सोडत झाली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये एकूण दोन नगरपरिषद आणि सहा नगरपंचायत असून या सर्वांच्या अध्यक्ष पदांची आरक्षण सोडत जाहीर झाली आहे.
जाहीर झालेल्या आरक्षण सोडती प्रमाणे जिल्ह्यातील सावंतवाडी नगर परिषदेचे नगराध्यक्ष पद खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी आरक्षित झाले आहे, तर मालवण नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला यासाठी राखीव झाला आहे. त्याचबरोबर कणकवली नगरपंचायतीचे नगराध्यक्ष पद हे नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग यासाठी राखीव झाला आहे. तर वेंगुरला नगरपरिषद तसेच कसई दोडामार्ग नगरपंचायत, कुडाळ नगरपंचायत, देवगड जामसंडे तसेच वाभवे वैभववाडी या नगरपंचायती खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित झाल्या आहेत.










