
सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या मुख्यालयातील रस्त्यांची अवस्था म्हणजे जणू यमधर्माचा फासच बनली आहे. येथे येणारा नागरिक पुन्हा सुखरूप घरी परतेल याची शाश्वती देता येत नाही, अशी स्थिती निर्माण झाली आहे. या रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे २३ सप्टेंबर २०२५ रोजी डॉन बॉस्को शाळेसमोर झालेल्या अपघातात शासकीय कर्मचारी हेमलता कुडाळकर यांचा मृत्यू झाला. या घटनेला कारणीभूत ठरलेल्या शासकीय यंत्रणा आणि ठेकेदारांवर गुन्हा दाखल करण्यात यावा, या मागणीसाठी सावंतवाडी तालुक्यातील निरवडे येथील गावडे यांनी आजपासून जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे.
श्रीमती गावडे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जिल्हा मुख्यालयात मंत्री, अधिकारी आणि नागरिक यांची सतत वर्दळ असते. तरीदेखील रस्त्यांची दुर्दशा इतकी वाढली आहे की, अपघात होणे ही जणू रोजची बाब बनली आहे. रस्त्यावर झालेल्या अपघातात मृत्यू झाल्यास वाहनचालकावर गुन्हा दाखल करण्याची पद्धत सुरू आहे; मात्र खरे दोषी असलेल्या संबंधित यंत्रणा व ठेकेदारांविरुद्ध कारवाई केली जात नाही, ही अन्यायकारक बाब आहे, असे त्यांनी नमूद केले आहे.
त्यापुढे म्हणाल्या, “प्रत्येक वाहनधारक रोड टॅक्स भरतो, पण सुरक्षित रस्ता मिळत नाही. जिल्ह्यातील रस्त्यांची स्थिती दयनीय असून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बंगल्यासमोरही मोठमोठे खड्डे आहेत. तरीसुद्धा संबंधित विभाग आणि ठेकेदार यांच्याकडून कोणतीही कारवाई केली जात नाही.”
रस्त्यांच्या दुरावस्थेमुळे जीवितहानी झालेल्या प्रकरणांमध्ये संबंधित शासकीय यंत्रणा व ठेकेदारांवर गुन्हे दाखल करून पीडितांना न्याय मिळावा, अशी ठाम मागणी श्रीमती गावडे यांनी केली आहे. “जोपर्यंत दोषींवर गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत उपोषण सुरूच राहील असेही त्यांनी सांगितले.










