जीवन आनंद संस्थेला 'संत ईश्वर सन्मान' पुरस्कार

Edited by: लवू म्हाडेश्वर
Published on: October 06, 2025 15:56 PM
views 128  views

सिंधुदुर्गनगरी : रस्त्यावरील निराधार वंचितांच्या पुनर्वसन कार्यासाठी विशेषतः महिला व बालविकास क्षेत्रातील  कार्यासाठी जीवन आनंद संस्थेला हा पुरस्कार प्राप्त झाला असून संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संदिप लावण्यवती प्रभाकर परब यांना राजधानी दिल्लीत संत ईश्वर सन्मान पुरस्कार-2025 प्रदान करून संस्थेच्या कार्याचा गौरव करण्यात आला.केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंग चौहान व केंद्रीय पर्यावरण मंत्री भुपेंदर यादव ,संत ईश्वर सन्मान समितीचे अध्यक्ष कपिल खन्ना, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबाळे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सन्मान सोहळा संपन्न झाला.

देशभरात समाजातील  उपेक्षित वर्गाच्या हितासाठी आणि समाज विकासासाठी कार्य करणा-या 16 व्यक्ती आणि संस्थाना संत ईश्वर सन्मान पुरस्काराने यावेळी सन्मानित करण्यात आले. रस्त्यावरील निराधार,वंचित बांधवांचे पुनर्वसनासाठी  विशेषत: महिला व बालकांचे विकासासाठी जीवन आनंद संस्थेच्या माध्यमातून करण्यात आलेल्या कार्यासाठी  संत ईश्वर सन्मान पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

पुरस्कार प्रदान सोहळ्याप्रसंगी झालेल्या मुलाखतीत बोलताना जीवन आनंद संस्थेचे अध्यक्ष संदिप परब यांनी,  देशभरात समाजातील जेष्ठ नागरिक, मानसिक रूग्ण यांचेसह अपत्य नसलेल्या जेष्ठ नागरिकांचे जीवन प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालल्याकडे लक्ष वेधून अगर वो (वयोवृद्ध लोग) नही होते तो हम नही होते. अशी प्रतिक्रीया यावेळी व्यक्त केली. निराधार वयोवृद्ध , मनोरूग्ण बांधवांना माया, प्रेम, कौटुंबिक जीवन मिळणे आवश्यक असल्याचे सांगून आपण सगळे मिळून आपल्या सभोवतालचे जग त्यांच्यासाठी आनंदाचे ,सुखा समाधानाचे, सुरक्षिततेचे करूया. असे संदिप यांनी पुढे म्हटले. जीवन आनंद संस्थेचे प्रसाद आंगणे, आशिष कांबळी यांची पुरस्कार सोहळ्यास उपस्थित होती.