
सिंधुदुर्गनगरी : गो संवर्धन व गो उत्पादन प्रशिक्षण कार्यशाळेचे उद्घाटन गो सेवा गतिविधी कोकण प्रांताचे संयोजक हरी ओमजी शर्मा यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष राजन कोरगांवकर होते. यावेळी सिंधुदुर्ग संयोजक चंद्रशेखर पुनाळेकर, लायन्स क्लब ऑफ कुडाळचे अध्यक्ष आनंदजी कर्पे, मुख्याध्यापक संघाचे जिल्हाध्यक्ष वामनजी तर्फे, दिनेशजी म्हाडगूत, लायन ट्रेझरर जीवन बांदेकर, राऊत आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी गोबरापासून तयार केलेल्या सुबक गणेशमूर्तीचे मान्यवरांना देऊन स्वागत करण्यात आले. कार्यशाळेसाठी विविध क्षेत्रातील मान्यवर, स्वयंसेवी संस्था, आश्रमशाळांचे प्रतिनिधी, हायस्कूलचे मुख्याध्यापक, विद्यार्थी, उत्पादक तसेच गोव्यातून आलेले काही प्रतिनिधीही उपस्थित होते. सेंद्रिय उत्पादनांचे विशेष स्टॉल्स या ठिकाणी लावण्यात आले होते.
कार्यशाळेत हरी ओमजी शर्मा यांनी गाईच्या सर्वांगिण उपयोगांविषयी प्रात्यक्षिकाद्वारे माहिती दिली. त्यांनी गो पणती, गो धूप, अगरबत्ती, साबण, फिनाईल, उटणे इत्यादी सेंद्रिय वस्तूंचे प्रत्यक्ष नमुने दाखवले व त्यांचे पर्यावरणपूरक फायदे स्पष्ट केले. तसेच सेंद्रिय शेतीसाठी आवश्यक साहित्याविषयी मार्गदर्शन केले.
राजन कोरगांवकर यांनी आपल्या भाषणात देशी गाईंचे सांस्कृतिक व आर्थिक महत्व अधोरेखित करताना ५० वर्षांपूर्वीची स्थिती व आजची परिस्थिती याची तुलना करून उपस्थितांना विचार करायला भाग पाडले.
स्नेहल पेडणेकर यांनी मोबाईल रेडिएशन चिपचे महत्त्व सांगितले. त्यानंतर हरी ओमजी शर्मा यांनी प्रत्यक्ष प्रात्यक्षिकातून रेडिएशनचे दुष्परिणाम दाखवून दिले. श्री. स्नेहल पेडणेकर, श्रीम. रुपाली देसाई, श्री. सचिन परब व श्रीम. तन्वी परब यांनी गोमय वस्तूंचे विशेष प्रदर्शन भरवले.
पुढील उपक्रम जाहीर
1. शाळांमध्ये गोमाता अभ्यास विषयावर परीक्षा
2. बसू बारस साजरा करण्याचा कार्यक्रम
3. बचत गटांना गोमय वस्तू निर्मितीचे प्रशिक्षण
4.वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध करून देणे
5. महिलांसाठी आरोग्य शिबीराचे आयोजन
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गोसेवा गती विधीचे सर्व पदाधिकारी, लायन्स क्लब कुडाळ, प्राथमिक शिक्षक समिती व जिल्हा मुख्याध्यापक संघ यांनी मोलाचे सहकार्य दिले. गोकुळधाम गोशाळा, नंदकुमार राणे, भाऊ आजगांवकर, राऊत, प्रभाकर राऊळ यांचेही सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाबाजी भोई यांनी केले.










