माय भारतच्या राज्य संचालकपदी के. के. घाटवळ

Edited by:
Published on: September 29, 2025 14:58 PM
views 100  views

सिंधुदुर्ग : युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय, भारत सरकारच्या “माय भारत” (MY Bharat) या कार्यालयात राज्य संचालक (State Director) म्हणून  के. के. (कालिदास कांता) घाटवळ यांनी नुकताच मुंबई येथील कार्यालयात पदभार स्वीकारला आहे. युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी अखिल भारतीय पातळीवर कार्यरत असलेल्या “माय भारत” संस्थेला त्यांच्या अनुभवसंपन्न नेतृत्वाचा लाभ मिळणार आहे.

प्रदीर्घ आणि उल्लेखनीय कारकीर्द

गोव्याच्या शिरगाव-अस्नोडा गावचे सुपुत्र असलेले घाटवळ यांनी १९९४ साली नेहरू युवा केंद्र (NYK) मडगाव, गोवा येथे जिल्हा युवा समन्वयक म्हणून कारकिर्दीला सुरुवात केली. १९९८ पर्यंत पणजी येथे कार्यभार सांभाळल्यानंतर त्यांची बदली लातूर जिल्ह्यात झाली. त्याच काळात झालेल्या किल्लारी भूकंपादरम्यान युवकांना संघटित करून त्यांनी मदतकार्यात भरीव योगदान दिले.

सिंधुदुर्गातील सुवर्णकाळ

सन २००० मध्ये त्यांची बदली सिंधुदुर्ग जिल्ह्यात झाली. या कार्यकाळात त्यांनी राष्ट्रीय युवा संमेलन आयोजित करून जिल्ह्याची ओळख देशभर पोहोचवली. राष्ट्रीय पुनर्निर्माण वाहिनी कार्यक्रमांतर्गत १०० युवकांची सक्षम टीम उभी करून समाजकार्यात युवकांचा सहभाग वाढवला.

भुज (गुजरात) येथे झालेल्या विनाशकारी भूकंपानंतर सिंधुदुर्गातील १०० युवकांसह महाश्रमदानात सहभागी होऊन त्यांनी राष्ट्रीय ऐक्य आणि सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडवले. या काळात त्यांनी ४५० हून अधिक वनराई बंधारे उभारून जलसंधारणाचा आदर्श निर्माण केला. जनगणना पथनाट्य, सिंधू जल मेळावा, क्षयरोग निर्मूलन, गाव तेथे मंडळ अशा अनेक जनजागृती मोहिमा राबवून युवकांना सक्रिय केले.

त्यांच्या नेतृत्वाखाली काम केलेल्या अनेक कार्यकर्त्यांनी आज पत्रकार, संपादक, सरपंच, जिल्हा परिषद सदस्य, सभापती, नगरसेवक तसेच जिल्हा परिषद अध्यक्ष अशा जबाबदारीच्या पदांवर यशस्वी कामगिरी केली आहे.

पुढील कामगिरी आणि नेतृत्व

सिंधुदुर्गनंतर त्यांनी सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी तसेच मडगाव आणि पणजी (गोवा) येथेही नेहरू युवा केंद्राचे कार्य प्रभावीपणे पार पाडले. सध्या ते सिंधुदुर्ग जिल्ह्यात उपसंचालक (जिल्हा युवा समन्वयक) पद सांभाळत असतानाच, आता “माय भारत” चे राज्य संचालक म्हणूनही कार्यरत आहेत.

प्रेरणादायी योगदान

राष्ट्रीय एकात्मता, युवकांचे संघटन, जलसंधारण आणि सामाजिक जाणीवा यामधून श्री. घाटवळ यांनी युवाशक्तीला सकारात्मक दिशा दिली आहे. सक्षम नेतृत्व निर्माण करण्यात त्याचं महत्वपूर्ण योगदान राहील आहे. त्यांच्या नेतृत्वाने घडवलेली ही प्रदीर्घ आणि यशस्वी वाटचाल भावी पिढ्यांसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरेल असा विश्वास युवकांतुन व्यक्त होतं आहे.