
सिंधुदुर्गनगरी : सिंधुनगरी येथील डॉन बॉस्को समोरील रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यात मंगळवारी सायंकाळी चार वाजण्याच्या दरम्यान बाईक आदळली व मागे बसलेल्या श्रीमती हेमलता धोंडू कुडाळकर या फेकल्या गेल्या. त्यांच्या डोक्यात गंभीर दुखापत झाली व उपचारास नेत असतानाच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्या कुडाळ येथील रहिवासी व सिंधुदुर्ग नगरी येथील सहाय्यक लेखाधिकारी असून दै. प्रहार व प्रहार डिजिटल चे कुडाळ प्रतिनिधी विलास कुडाळकर यांच्या त्या ज्येष्ठ भगिनी होत्या.
अत्यंत साध्या, मनमिळावू स्वभाव यामुळे सिंधू नगरी येथील शासकीय कर्मचाऱ्यांमध्ये त्या सर्वांच्याच ओळखीच्या होत्या. जिल्हा परिषदेतील लेखा आणि कोषागार कार्यालयामध्ये त्या सहाय्यक लेखाधिकारी म्हणून सरकारी सेवेत होत्या. पतपेढी मधील कामासाठी त्या गेल्या होत्या. डॉन बॉस्को समोरील खड्ड्यात त्यांची बाईक आदळली व पाठीमागे बसलेल्या कुडाळकर रस्त्यावर फेकल्या गेल्या व डोक्यात गंभीर दुखापत होऊन त्यांना आपला प्राण गमवावा लागला.
या अपघाताची व त्यानंतर लगेचच तिच्या झालेल्या दुर्दैवी मृत्यूची बातमी समजतात सिंधुदुर्ग नगरीतील अधिकारी व कर्मचारी व तिचे कुटुंबीय शोकाकुल झाले. रस्त्यावरील खड्डे व त्यातून निरपराध बळी याची चर्चा मात्र सुरू झाली.










