
सिंधुदुर्गनगरी : जिल्हा अंतर्गत शिक्षक बदली प्रक्रिया पूर्ण होऊनही अद्याप कार्यमुक्ती न दिल्याने प्राथमिक शिक्षक समितीच्या शिष्टमंडळाने मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांची भेट घेत वस्तुस्थिती मांडली होती.यावर मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सकारात्मक प्रतिसाद देत लवकरच कार्यमुक्ती करू असे आश्वासन शिक्षक समितीला दिले होते.परंतु अद्यापही कार्यमुक्ती न केल्याने संघटनेने आंदोलनाचा इशारा दिला आहे.
प्राथमिक शिक्षकांची जिल्हा अंतर्गत बदली प्रकिया ऑनलाईन स्वरूपात पार पडली असून शासनाने बदलीचे आदेश प्रत्येक बदलीधारक शिक्षकाच्या ईमेल वर पाठविले आहेत.परंतु एका आदेशान्वये शासनाने बदली कार्यमुक्ती बाबतचे सर्वाधिकार जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिले आहेत.राज्यातील बहुतांश जिल्ह्यांनी बदली कार्यमुक्ती करून शिक्षकांना बदली शाळेवर हजर करून घेऊन बदली कार्यवाही पूर्ण केली आहे,मात्र सिंधुदुर्ग जिल्ह्यात ही कार्यवाही रखडल्याने प्राथमिक शिक्षक समितीचे राज्य सरचिटणीस राजन कोरगावकर यांचे नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मुख्य कार्यकारी अधिकारी यांची भेट घेत याबाबत कार्यमुक्ती करण्याची मागणी केली होती.यावेळी जिल्हाध्यक्ष विठ्ठल गवस,जिल्हा सरचिटणीस तुषार आरोसकर,कुडाळ अध्यक्ष शशांक आटक, सचिव महेश गावडे यांचेसह पदाधिकारी व बदलीधारक शिक्षक उपस्थित होते.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी संघटनेला कार्यमुक्ती करण्याचे आश्वासन दिले होते.परंतु अद्यापही कार्यमुक्ती न झाल्याने संघटनेने आंदोलन करण्याचा इशारा प्रशासनाला दिला आहे.तसेच याबाबत लवकरच पालकमंत्री नितेश राणे यांची भेट घेऊन प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे शिक्षक समितीच्या पदाधिकारी यांनी सांगितले आहे.










