जिल्हा ग्राहक तक्रार निवारण समितीची बैठक

ग्राहक हक्कांचे प्रभावी संरक्षण व तक्रारींचे त्वरीत निवारण यावर भर
Edited by: लवू म्हाडेश्वर
Published on: September 22, 2025 19:55 PM
views 67  views

सिंधुदुर्गनगरी : जिल्हा ग्राहक तक्रार निवारण समितीची बैठक जिल्हाधिकारी तथा समितीच्या अध्यक्ष तृप्ती धोडमिसे यांच्या अध्यक्षतेखाली आज संपन्न झाली. या बैठकीत ग्राहकांच्या विविध तक्रारींचा आढावा घेऊन त्यांचे तात्काळ निवारण करण्याबाबत संबंधित विभागांना सूचना देण्यात आल्या.

फळ विक्रेते अनैसर्गिक पध्दतीने फळ पिकवून ग्राहकांना विक्री करत असल्याची तक्रार अशासकीय सदस्यांनी केली. याबाबत कृषी आणि अन्न व औषध प्रशासनाने नियमांनुसार कार्यवाही करावी. दूरसंचार कंपनीने ग्राहकांना उत्कृष्ट सेवा द्याव्यात. बस स्थानकांवर प्रवाशांना सुविधा मिळणे आवश्यक आहे. स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध करुन द्यावे, शौचालयांची नियमित स्वच्छता करावी. ग्राहक हे अर्थव्यवस्थेचे केंद्रबिंदू आहेत. त्यांच्या तक्रारींना गांभीर्याने घेऊन वेळेत निवारण करणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. शासनाच्या धोरणानुसार ग्राहक हक्कांचे रक्षण करणे हे प्रत्येक विभागाने प्राधान्याने करावे असेही निर्देश जिल्हाधिकारी श्रीमती तृप्ती धोडमिसे यांनी यावेळी संबंधित विभाग प्रमुखांना दिले.

या बैठकीला विभाग प्रमुखांनी प्रतिनिधी न पाठवता स्वत: उपस्थित असणे आवश्यक आहे मात्र अनेक विभाग प्रमुख गैरहजर असल्याचे निदर्शनास आल्याने त्यांना कारणे दाखवा नोटीस पाठविणे आवश्यक असल्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी विजय सहारे यांनी अध्यक्षांच्या निदर्शनास आणून दिले.

या बैठकीला जिल्हा पुरवठा अधिकारी विजय सहारे, जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत, तसेच अशासकीय सदस्य आनंद मेस्त्री, ॲङ. नकुल पार्सेकर आणि विष्णूप्रसाद दळवी तसेच  अन्न व औषध प्रशासन, वीज वितरण कंपनी, दूरसंचार, पोलिस प्रशासन, परिवहन विभाग तसेच इतर संबंधित शासकीय विभागांचे अधिकारी उपस्थित होते.