
सिंधुदुर्गनगरी : मुख्यमंत्री समृध्द पंचायत राज अभियानाची पहिली कार्यशाळा दिनांक ११ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ९ वाजता इच्छापूर्ती मंगल कार्यालय, सिंधुदुर्गनगरी येथे आयोजित करण्यात येणार आहे. या कार्यशाळेचे उद्घाटन पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते होईल. जिल्ह्यातील सर्व सरपंच, ग्रामसेवक आणि समाजसेवी संस्था प्रतिनिधींना विशेषतः निमंत्रित करण्यात आले आहे. किमान एक हजार लोक या प्रशिक्षणात सहभागी होणार आहेत, अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील गावांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी हे स्पर्धात्मक अभियान राबविण्यात येत आहे. जिल्ह्यात यशस्वी राबविण्यासाठी प्रशासनाने विशेष तयारी केली असून, पहिली कार्यशाळा ११ सप्टेंबर रोजी राबवली जाणार आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी खेबुडकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनाच्या औचित्याने १७ सप्टेंबर २०२५ रोजी मुख्यमंत्री समृध्द पंचायत राज अभियानाचा शुभारंभ होत आहे, आणि हे अभियान ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत सुरू राहणार आहे.
यामध्ये शासनाच्या प्रत्येक योजनांचा लाभ ग्रामीण भागातील जनतेपर्यंत पोहोचवून सर्व गाव समृद्ध करण्याचा उद्देश आहे. लोकसहभाग व श्रमदानाच्या माध्यमातून हे अभियान राबवले जाणार असून, जिल्ह्यातील सर्व ग्राम पंचायतांनी सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
कार्यक्रमात पुढील प्रमुख मुद्द्यांवर लक्ष केंद्रित केले जाणार आहे
लोकाभिमुख आणि गतिमान प्रशासन
नागरिकांच्या समस्या निराकरण
ऑनलाइन सेवा सुलभ करणे
सर्व शासकीय संस्था CCTV निगराणीखाली आणणे
शासकीय दप्तर अद्ययावत करणे
दिव्यांग व्यक्तींना ओळखपत्र वितरण
प्रत्येक गावात पिण्याच्या पाण्याचा ताळेबंद तयार करणे
१००% कर पट्टी वसुली
ग्राम पंचायतांसाठी स्वतंत्र वेबसाइट तयार करणे
शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करणे
या कामांसाठी लोकवर्गणीचा सहभाग घेऊन कामे पार पाडली जाणार असल्याचे सांगण्यात आले. ग्राम पंचायतांना तालुका स्तरापासून राज्य स्तरापर्यंत १५ लाख ते ५ कोटी रुपयांपर्यंत पुरस्कार जाहीर करण्यात येणार आहेत. तसेच पंचायत समित्या व जिल्हा परिषद यांना विभाग आणि राज्यस्तरावर मोठ्या प्रमाणावर पुरस्कार देण्यात येणार आहेत. अभियानाची पहिली ग्रामसभा ११ ते १६ सप्टेंबर दरम्यान होणार असून, दुसरी ग्रामसभा १७ सप्टेंबर रोजी पार पडणार आहे, असे रवींद्र खेबुडकर यांनी सांगितले.










