
सिंधुदुर्गनगरी : अनेक वर्षांच्या संघर्षानंतर आणि पालकमंत्री, खासदार, आमदार तसेच स्थानिक जनप्रतिनिध्यांच्या अथक प्रयत्नानंतर सिंधुदुर्गनगरी नवनगर विकास प्राधिकरणाने मोठा पाझर फुटवला आहे. येथील नागरिकांच्या दैनंदिन समस्या दूर करण्यासाठी एक कोटी ३४ लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे, ज्यात रस्त्यांचे खडीकरण व दिवाबत्तीची व्यवस्था सुधारण्यासाठी महत्वाची योजना समाविष्ट आहे. भाजपच्या ओरोस मंडळ अध्यक्षा सौ सुप्रिया वालावलकर यांनी आयोजित पत्रकार परिषदेत याची माहिती दिली. या प्रसंगी ओरोस मंडळ अध्यक्ष भाई सावंत, प्राधिकरण समिती सदस्य महेश पारकर, सामाजिक कार्यकर्ते संतोष वालावलकर, ओरोस बुद्रुक ग्राम पंचायत सदस्य राजश्री नाईक, तेजश्री राऊळ आदी उपस्थित होते.
वालावलकर म्हणाल्या, “सिंधुदुर्ग जिल्ह्याची राजधानी असलेल्या सिंधुदुर्गनगरीतील रहिवासी लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. परंतु अनेक वर्षे भूखंड विकत घेतलेल्या नागरिकांना नागरी सुविधा मिळण्यास अपुरी स्थिती आहे. रस्त्यांचे खड्डे, दिवाबत्तीची असमाधानी स्थिती यामुळे रहिवाशांचे जीवनमान खालावले आहे.”
याप्रकरणी पालकमंत्री नितेश राणे, खासदार नारायण राणे आणि आमदार निलेश राणे यांचे विशेष लक्ष वेधण्यात आले होते. तसेच भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत व महेश पारकर यांनीही प्राधिकरणवर दबाव टाकून अखेर एक कोटी ३४ लाख रुपयांचा निधी मंजूर करून घेतला आहे. यापैकी १ कोटी ९ लाख रुपये रस्त्यांच्या खडीकरणासाठी आणि २५ लाख रुपये दिवाबत्ती सुधारण्यासाठी मंजूर करण्यात आले असून, एकूण सहा रस्त्यांची कामे लवकरच सुरू होणार आहेत. या कामांचा शुभारंभ दसऱ्याच्या सणाच्या निमित्ताने पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
नागरी सुविधेसाठी २० लाखांचा निधी मंजूर
ओरोस बुद्रुक ग्राम पंचायत कार्यक्षेत्रात नागरी सुविधे अंतर्गत सभामंडप उभारण्यासाठीही २० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. “हे काम नागरिकांच्या अनेक वर्षांच्या मागणीला न्याय देणारे असून, लवकरच सभामंडपाचे काम सुरू होणार आहे,” असे सौ वालावलकर यांनी सांगितले.










