
सिंधुदुर्गनगरी : छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत ‘सेवा पंधरवडा’ उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. या सेवा पंधरवड्यात पाणंद रस्ते, सर्वांसाठी घरे आणि नावीन्यपूर्ण उपक्रम याचे काटेकोर नियोजन करावे. या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संबंधित विभागांनी सज्ज राहण्याचे निर्देश जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी दिले.
जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी सावंतवाडी आणि दोडामार्ग तहसील कार्यालयाला भेट दिली यावेळी त्यांनी सेवा पंधरवडा आणि ॲग्रीस्टॅक नोंदणीबाबत आढावा घेतला. यावेळी प्रांताधिकारी हेमंत निकम सावंतवाडी तहसीलदार श्रीकृष्ण पाटील आणि दोडामार्ग तहसीलदार प्रज्ञा राजमाने यांच्यासह अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
धोडमिसे पुढे म्हणाल्या १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर दरम्यान होणाऱ्या सेवा पंधरवड्यात पाणंद रस्ते, सर्वांसाठी घरे आणि नावीन्यपूर्ण उपक्रम याचे नियोजन करून जिल्ह्यातील नागरिकांना जास्तीत जास्त सेवांचा लाभ द्या. अग्रिस्टॅक (AgriStack) योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सर्वांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी या योजनेअंतर्गत करावयाच्या कार्यवाहीबाबत अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.
या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी निर्देश देताना सांगितले की, गाव नकाशावर नोंद असलेले तसेच नोंद नसलेले पण वापरात असलेले रस्ते व क्षेत्र शोधून त्यांचे सर्वेक्षण करून सीमांकन करणे आवश्यक आहे. या कामासाठी महसूल यंत्रणेने काटेकोरपणे लक्ष देण्याचेही त्यांनी निर्देश दिले.