LIVE UPDATES

सिंधुदुर्गच्या सागरी सुरक्षेसाठी 'मरिन होमगार्ड' सज्ज

जिल्ह्यातील सहा सागरी पोलीस ठाण्यांमध्ये ६० मरिन होमगार्डची नियुक्ती | किनारपट्टी सुरक्षेला मिळणार बळ
Edited by: लवू म्हाडेश्वर
Published on: June 12, 2026 20:20 PM
views 51  views

सिंधुदुर्गनगरी : पर्यटन, मत्स्यव्यवसाय आणि संवेदनशील बंदरांच्या दृष्टीने महत्त्व असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सागरी सुरक्षेला आता अधिक बळकटी मिळणार आहे. जिल्ह्यातील विजयदुर्ग, देवगड, आचरा, मालवण, निवती आणि वेंगुर्ले या सहा सागरी पोलीस ठाण्यांमध्ये प्रत्येकी दहा अशा एकूण ६० "मरिन होमगार्ड"ची नियुक्ती करण्यात आली आहे. सागरी सुरक्षा व्यवस्थेला अधिक सक्षम करण्यासाठी स्थानिक पातळीवर राहणाऱ्या आणि पोहण्यात प्राविण्य असलेल्या युवकांची निवड करण्यात आली आहे. हे मरिन होमगार्ड लँडिंग पॉईंट, बंदरे, समुद्रकिनारे तसेच जेटी परिसरात बंदोबस्त आणि गस्त घालण्याचे काम करणार आहेत. दि. १२ जून २०२६ पासून त्यांची नियुक्ती प्रभावी झाली असून, १३ जून रोजी सकाळी ८ वाजता संबंधित सागरी पोलीस ठाण्यांमध्ये त्यांनी कर्तव्यावर हजेरी लावली.

या मरिन होमगार्डना अपर पोलीस अधीक्षक कु. नयोमी साटम यांच्या मार्गदर्शनाखाली दोन दिवसीय विशेष प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षणामध्ये सागरी सुरक्षेचे महत्त्व, किनारपट्टीवरील दक्षता, संशयित बोटींची ओळख, बोर्डिंग ऑपरेशन, सागरी गस्तीतील जबाबदाऱ्या, वायरलेस कम्युनिकेशनचा वापर, नेव्हिगेशन व जीपीएसची प्राथमिक माहिती, शोध व बचाव कार्य, जेमिनी बोट व इंजिन हाताळणी, सायबर गुन्ह्यांबाबत जागरूकता, आपत्ती व्यवस्थापन, गुप्तवार्ता संकलन, अग्निशमन तसेच किनाऱ्यावर आढळणाऱ्या बेवारस वस्तूंची हाताळणी यांसह प्रथमोपचार आणि सीपीआरचे प्रशिक्षण देण्यात आले.

प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर सर्व ६० मरिन होमगार्डना प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. सागरी भागात उद्भवणाऱ्या कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला तत्परतेने प्रतिसाद देण्यासाठी हे प्रशिक्षित मनुष्यबळ महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. सिंधुदुर्गची विस्तीर्ण किनारपट्टी, वाढते पर्यटन आणि मत्स्यव्यवसायाच्या पार्श्वभूमीवर मरिन होमगार्डची नियुक्ती हा सागरी सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण निर्णय मानला जात आहे. स्थानिक युवकांच्या सहभागातून किनारपट्टीवरील सुरक्षा यंत्रणा अधिक सक्षम होण्यास मदत होणार असून, जिल्ह्याच्या सागरी संरक्षणाला नवसंजीवनी मिळणार आहे. ही माहिती पोलीस निरीक्षक (स्थानिक गुन्हे शाखा) प्रविण कोळे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकातून देण्यात आली आहे.