LIVE UPDATES

'शाळा प्रवेशोत्सवा'तून ३०९ शाळांना लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांचा आधार

१५ जून रोजी जिल्हाभर राबविण्यात येणार विशेष उपक्रम | विद्यार्थ्यांचे स्वागत, पाठ्यपुस्तक वितरणासह शाळा विकासावर भर
Edited by: लवू म्हाडेश्वर
Published on: June 12, 2026 20:11 PM
views 24  views

सिंधुदुर्गनगरी : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागामार्फत शैक्षणिक वर्ष २०२६-२७ च्या प्रारंभी "शाळा प्रवेशोत्सव" हा विशेष उपक्रम उत्साहात राबविण्यात येणार असून, जिल्ह्यातील ३०९ जिल्हा परिषद शाळांना लोकप्रतिनिधी तसेच वर्ग १ व वर्ग २ मधील अधिकारी भेटी देणार आहेत. १५ जून रोजी शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे स्वागत करून त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात सहभागी करून घेण्याचा या उपक्रमामागील उद्देश आहे. मागील वर्षी मुख्यमंत्री यांच्या निर्देशानुसार १०० शाळांना भेटी देण्याचा उपक्रम राबविण्यात आला होता. त्याच धर्तीवर यंदाही हा उपक्रम अधिक व्यापक स्वरूपात आयोजित करण्यात आला आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री, खासदार, आमदार, जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष, विविध समित्यांचे सभापती, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, तसेच जिल्हा व तालुकास्तरीय वर्ग १ व वर्ग २ अधिकारी शाळांना भेट देणार आहेत.

या भेटीदरम्यान नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांचे स्वागत, मोफत पाठ्यपुस्तकांचे वितरण, गणवेश व अन्य शैक्षणिक साहित्याबाबत आढावा, विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचे मूल्यमापन, शाळांतील भौतिक सुविधांची पाहणी केली जाणार आहे. तसेच शाळांमधील स्वच्छता, पोषण आहार, पाणीपुरवठा, शौचालयांची स्थिती, क्रीडा व कला सुविधा आदी बाबींचीही तपासणी करून आवश्यक त्या सूचना संबंधित यंत्रणांना दिल्या जाणार आहेत.

जिल्हा परिषद शाळांमधील पटसंख्या वाढविणे, पालकांचा शिक्षणाविषयी सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करणे आणि विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देणे, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. शाळा व्यवस्थापन समिती सदस्य आणि ग्रामस्थांनीही या उपक्रमात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील १,३२३ शाळांपैकी पहिल्या टप्प्यात ३०९ शाळांना भेटी देण्यात येणार असून, प्रत्येक लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांना विशिष्ट शाळांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. याशिवाय शिक्षण विभागातील अधिकारी, प्राचार्य, शिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी आणि विस्तार अधिकारी यांनाही काही शाळा दत्तक देण्यात आल्या असून, वर्षभर त्या शाळांच्या विकासासाठी मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

पालकांना आवाहन

आपल्या पाल्याच्या सर्वांगीण विकासासाठी आणि दर्जेदार शिक्षणासाठी त्यांचा प्रवेश जवळच्या जिल्हा परिषद शाळेत निश्चित करावा, असे आवाहन प्राथमिक शिक्षण विभागामार्फत करण्यात आले आहे. या संदर्भातील माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी फारुखी अहमदी यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकातून देण्यात आली आहे.