
सावंतवाडी : राष्ट्रीय आविष्कार अभियान २०२२-२३ अंतर्गत राज्य विज्ञान व गणित शिक्षण संस्था नागपूर पुरस्कृत जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, सिंधुदुर्ग व सिंधुदुर्ग जिल्हा विज्ञान मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील निवडक माध्यमिक शाळातील इयत्ता ९ वी तील विज्ञान विषयात प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांसाठी विज्ञान अभ्यास सहलीचे आयोजन करण्यात आले होते.
सदर सहलीत जिल्ह्यातील वैज्ञानिक माहिती देणारी केंद्रे व विविध उद्योग संस्थांना भेटी देण्यात आल्या. यामध्ये पंचम खेमराज महाविद्यालयातील प्राणिशास्त्र, वनस्पतीशास्त्र, रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र या प्रयोगशाळा, फळ संशोधन केंद्र, वेंगुर्ला यातील फळ बागायतीची विविध तंत्रे, कुडाळ औद्योगिक वसाहतीतील विविध उद्योगधंदे, प्रदूषण तसेच हवा, पाणी, माती यांचे परीक्षण विषयक माहिती देणारी गडार्क टेस्टींग लॅब, वसुंधरा विज्ञान केंद्र, नेरूरपार येथील विविध प्रयोग यांची माहिती देण्यात आली.
सदर उपक्रमाचे नियोजन जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्या अनुपमा तावशीकर यांच्या अध्यक्षतेखाली व सिंधुदुर्ग जिल्हा विज्ञान मंडळाचे अध्यक्ष पांडुरंग काकतकर, सचिव प्रकाश कानुरकर, उपाध्यक्ष रघुनाथ कारेकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. यात वाहतूक नियोजन कणकवली तालुका विज्ञान मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत चव्हाण यांनी केले. तसेच सत्यपाल लाडगावकर - देवगड, अनंत साईल - कुडाळ, संजय तुळसकर - वैभववाडी, ऋषिकेश गावडे - सावंतवाडी, मिलिंद गावकर - मालवण, संतोष पवार, नेहा सावंत - वेंगुर्ला, राजाराम फर्जंद - दोडामार्ग यांनी तालुका समन्वयक तसेच मार्गदर्शक म्हणून काम पाहिले.
जिल्हा विज्ञान मंडळ तसेच डाएटतर्फे राबविलेला सदर उपक्रम हा राज्यातील सर्व जिल्हयांसाठी आदर्शवत असून लवकरच सिंधुदुर्गातील शिक्षकांसाठी आधुनिक तंत्रज्ञानात पारंगत होण्यासाठी कोडींगचे प्रशिक्षण वर्ग सुरू करण्यात येणार आहेत. तसेच विद्यार्थ्यांसाठीही जिल्ह्यात विज्ञान केंद्रानिर्मितीसह विविध उपक्रम राबवले जाणार असल्याची माहिती राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी या उपक्रमाचे कौतुक करताना दिली. याप्रसंगी जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी व मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांनी सहलीत सहभागी विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प देऊन कौतुक केले व विज्ञान मंडळाच्या अशा विविध उपक्रमांना यापुढेही सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही दिली.