निशुल्क माहिती पुरवण्याचे आदेश..!

Edited by: विनायक गावस
Published on: March 14, 2024 13:14 PM
views 164  views

सावंतवाडी : सामाजिक कार्यकर्ते जयंत बरेगार यांनी माहितीच्या अधिकारात मागवलेली माहिती मुदतीत न पुरवल्याने ती निशुल्क पुरवण्यात यावी असे आदेश राज्य माहिती आयुक्त कोंकण खंडपीठाने पोलिस अधिक्षक कार्यालय विद्यमान जनमाहिती अधिकारी तथा सहाय्यक पोलीस निरीक्षक यांना दिले आहे. सामाजिक कार्यकर्ते श्री. जयंत बरेगार यांनी, कुडाळ पोलीस ठाण्यात, सावंतवाडी वनविभागातील बनावट बदली पास प्रकरणी  ०७ एप्रिल २०२१ रोजी, तत्कालीन वनपाल माणगांव, सुनील सावंत व इतरांवर फौजदारी गुन्हा दाखल करणेबाबत तक्रार अर्ज दाखल केला होता. याबाबत गुन्हा दाखल न केल्याने कुडाळ पोलीस निरीक्षक, यांचे कार्यालयासमोर १ मे २०२१ रोजी उपोषणास बसणार असले बाबत नोटीस दिली होती. परंतु तत्कालीन कुडाळ पोलिस निरिक्षकांनी उपोषणास बसणेस परवानगी नाकारली होती. त्यामुळे १ मे २०२१ रोजी उपोषणास बसणार असलेल्या किती नागरिकांना, संस्थांना उपोषणास परवानगी दिली किंवा नाकारलेबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक यांचे कार्यालयात दि. ०५ मे २०२१ रोजी माहितीच्या अधिकारात माहिती मागितली होती. सादर अर्जावर तत्कालीन जनमाहिती अधिकारी तथा सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्पना शिरदावडे यांनी माहिती देण्याचे नाकारले होते. त्यावर श्री बरेगार यांनी,  प्रथम अपिलीय अधिकारी तथा अपर पोलीस अधीक्षक तुषार पाटील यांचे कडे प्रथम अपील केले होते. सदर अर्जावर निकाल देताना त्यांनी अर्जदार यांना मु‌द्दा क्र.१.२.३.व ७ ची माहिती शुल्क घेऊन पुरवावी असे आदेश दिले. तसे तत्कालीन जनमाहिती अधिकारी शिरदावडे यांना कळविले होते. परंतु माहिती मुदतीत न पुराविलेने ती मोफत पुरवावी या मागणी करिता श्री बरेगार यांनी दि. १७ ऑगस्ट २०२१ रोजी राज्य माहिती आयुक्त कोंकण खंडपीठ यांचेकडे केली होती. यावर ३ जानेवारी २०२४ ने निकाल लागला असून त्याचे आदेश नुकताच त्यांना प्राप्त झाला आहे. त्यामध्ये आत्ताचे विद्यमान जनमाहीती अधिकारी यांनी बरेगार यांना मोफत कागदपत्रे पुरविण्याचे देण्यात आले आहेत. आयोगा समोर बरेगार यांनी आपली बाजू स्वतः मांडली होती.