काजू बीच्या हमीभावासाठी मुख्यमंत्री शिंदेंना अजितदादांचं पत्र

अर्चना घारेंच्या मागणीची अजित पवारांकडून तात्काळ दखल
Edited by: विनायक गांवस
Published on: April 12, 2023 21:19 PM
views 172  views

सावंतवाडी : तळकोकणातील काजू उत्पादक शेतकऱ्यांच्या काजू बी साठी तातडीने हमीभाव जाहीर करावा, अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कोकण विभाग महिला अध्यक्षा अर्चना घारे-परब यांनी याबाबत अजित पवार यांच लक्ष वेधल्यानंतर विरोधी पक्षनेत्यांकडून तातडीने कार्यवाही करण्यात आली. 


तळकोकणातील बहुतांश शेतकरी काजू उत्पादक शेतकरी आहेत. गेल्यावर्षीच्या तुलनेत काजू बीचे दर सुमारे २५ ते ३० टक्के खाली घसरले आहेत. काजूगराचे दर वाढत असताना काजू बीचे दर कमी होत आहेत. गेल्या वर्षी मिळालेला १३५ ते १४० रुपयांचा दर या वर्षी १०० ते १०५ रुपयांवर आला आहे. काजू बी खरेदीचे व्यापाऱ्यांचे धोरण हे शेतकऱ्यांवर अन्यायकारक आहे. वातावरणातील बदल, मजुरीचे वाढलेले दर, खतांचे वाढलेले दर, कीड रोगासाठी करावा लागणारा खर्च, वन्य प्राण्यांसह आग व चोरांपासून होणारे नुकसान ही आव्हाने पेलत काजू उत्पादक काजूचे उत्पादन घेत असतात. परंतु, मनमानीपणे काजू बी चे दर व्यापारी पाडत असल्यामुळे काजू उत्पादकांना उत्पानाची शाश्वती देण्यासाठी सरकारने १६० रुपयांचा हमीभाव जाहीर करावा, अशी मागणी कोकणतील काजू उत्पादक शेतकऱ्यांची आहे.

शासनाने काजू उत्पादकांचे शोषण थांबवण्यासाठी तातडीने काजू बी साठी हमीभाव जाहीर करावा, अशी मागणी अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.