
दोडामार्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामविकासाच्या क्षेत्रात अनेक पुरस्कार पटकावलेल्या दोडामार्ग तालुक्यातील आयनोंडे–हेवाळे ग्रामपंचायतीच्या नव्याने बांधण्यात आलेल्या सुसज्ज ग्रामपंचायत कार्यालय इमारतीचे व महिला भवनाचे भव्य उद्घाटन मंगळवारी २३ डिसेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता होणार आहे.
या उद्घाटन सोहळ्यास जिल्ह्याचे पालकमंत्री तथा मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार असून आमदार व माजी मंत्री दीपक केसरकर, माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
कार्यक्रमाच्या निमित्ताने सकाळी नूतन वास्तूचे उद्घाटन व मान्यवरांचे मार्गदर्शन होणार असून, दुपारी आरोग्य शिबिर तसेच महिला भगिनींसाठी हळदी–कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

या सोहळ्यास जिल्हा व तालुका स्तरावरील विविध मान्यवर, अधिकारी, पदाधिकारी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. नव्या ग्रामपंचायत कार्यालय व महिला भवनामुळे स्थानिक प्रशासन अधिक सक्षम होण्यासोबतच महिलांसाठी स्वतंत्र व सशक्त व्यासपीठ उपलब्ध होणार आहे.
या उद्घाटन सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन ग्रामपंचायत आयनोंडे–हेवाळे यांच्या वतीने सरपंच सौ. साक्षी देसाई, उपसरपंच वैशाली गवस, ग्रामपंचायत अधिकारी संदीप पाटील तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांनी केले आहे.











