
दोडामार्ग : 'एक दिवस बळीराजा'साठी या उपक्रमाअंतर्गत मौजे कुडासे येथे मंगळवारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डी. एस. दिवेकर व उपविभागीय कृषी अधिकारी सावंतवाडी अजित अडसुळे यांनी प्रक्षेत्र पाहणी केली. या पाहणीत प्रथम भाऊ देसाई १.०० हे. काजू, सुलोचना नाना देसाई १.०० हे. काजू, शिवाजी भाऊ देसाई १.०० हे.काजू यांनी केलेल्या मग्रारोहायो फळबाग लागवड पाहणी व मार्गदर्शन केले. तसेच भात पिक स्पर्धा योजनेतील शेतकरी देवीदास विष्णु सावंत क्षेत्र -०.५०हे. यांच्या शेतावर भात पीक कापणीची पाहणी केली. यावेळी सोबत कुडासे सरपंच श्रीमती.पूजा बाबाजी देसाई यांसह सरिता सखाराम सावंत, पार्वती बाबाजी देसाई, निकिता देविदास सावंत, अक्षता अशोक सावंत या शेतकरी महिला व ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी गावातील शेतकरी यांना रब्बी क्षेत्र वाढ योजनेतून मसूरचे बियाणे सरपंच श्रीमती पूजा देसाई यांचे हस्ते वाटप करण्यात आले. तसेच वन्य प्राणी नुकसान व बंधारा बांधकाम याबाबत उपस्थित ग्रामस्थांनी विचारणा केली. याबाबतीत ग्राम पाणलोट समिती मार्फत कामे सुचावावित, असे आवाहन एस. एम. दिवेकर यांनी केले. यावेळी त्यांच्यासमवेत उपस्थित तालुका कृषी अधिकारी प्रमोद बनकर यांनी पी.एम.एफ.एम.ई प्रक्रिया योजनेत कुडासे गावातील शेतकरी यांनी अर्ज करणेबाबत आवाहन उपस्थित शेतकरी यांना केले आहे.