राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त डॉ. रुपेश पाटकर यांचं मार्गदर्शन

Edited by: विनायक गावस
Published on: June 30, 2023 19:35 PM
views 87  views

सावंतवाडी : या देशात समतेचा सर्वप्रथम पुकार संत तुकाराम महाराज यांनी करून वारकरी संप्रदायातून देशातील भेदाभेद हा अधर्म असल्याचा घणाघात आपल्या विचारातून त्यांनी व्यक्त केला. त्याच वारकरी संप्रदायाचा आदर्श राजर्षी शाहू महाराज यांनी आपल्या राज्यकारभारात अमलात आणून प्रजाहित दक्ष राजे आणि करूणेचा संगम अशी बिरुदावली त्याने आपल्या कर्तृत्वाने प्रजेत निर्माण केली असल्याचे प्रतिपादन प्रसिद्ध विचारवंत व मनोविकारतज्ञ डॉ. रुपशे पाटकर यांनी येथे केली. समता प्रेरणाभूमी संवर्धन समितीच्या विद्यमाने 'राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज मंदिर सभागृहात राजर्षी शाहू महाराज यांची सामाजिक न्यायाची भूमिका आणि स्वतंत्र भारतातील सामाजिक न्यायाचा प्रवास' या विषयावर गुरुवारी विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी डॉ. पाटकर प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष दीपक पडेलकर हे होते. यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या वंदना करंबळेकर, संस्थेचे सचिव मोहन जाधव, प्रा. डॉ. गणेश मर्गज इत्यादी उपस्थित होते. डॉ. पाटकर यांनी आजच्या एकादशीचे महात्म्य सर्वप्रथम सांगून वारकरी संप्रदायाने कसा समतेचा मंत्र या देशाला दिला, हे सर्वप्रथम स्पष्ट केले. राजर्षी शाहू महाराजांनी स्वातंत्र्यपूर्व काळात देशात संविधानाचे बंधन नसतानाही आपल्या राज्यात आरोग्य, शिक्षण यामध्ये केलेल्या प्रगतीचा आढावा घेऊन आपल्या राज्यात सर्वप्रथम सामाजिक आरक्षण, महिलांना समान न्याय, पुर्नविवाह असे विविध कायदे करून आपल्या संस्थानात समता निर्माण करण्याचा प्रयत्न केला. शिवाय दुष्काळ परिस्थितीत आपल्या प्रजेला दुष्काळाची झळ पोहचू नये म्हणून वेशांतर करून मुंबईच्या बाजारपेठेत किराणामाल खरेदी करणारा आणि समतेसाठी गंगाराम कांबळे सारख्या दलिताला हॉटेल काढून देऊन स्वतः तेथे जाणारा राजा, शिवाय आंतरजातीय विवाहाचे समर्थन करून स्वतःच्या कुटुंबातही त्याची अंमलबजावणी करणारा एकमेव राजा असल्याचे स्पष्ट केले. समता व करुणेचा मंत्र जपणारा आणि सर्वधर्मसमभावाचा त्यांनी कायदा त्यांनी आपल्या संस्थानात लागू केला. म्हणूनच ते एकमेवाद्वितीय राजा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षपदावरून बोलताना दीपक पडेलकर यांनी महापुरुषांचा विचार हा भाषणाचा विषय नसून तो जगण्याचा आणि प्रत्यक्ष कृतीत आणण्याचा विषय असल्याचे सांगून केवळ आणि केवळ 28 वर्ष राज्य कारभार करूनही शाहू महाराजांनी हिमालय पर्वताच्या उंचीचे या देशात सर्व क्षेत्रात उत्कृष्ट काम केले. त्यामुळेच 26 जून हा बहुजनांसाठी संकल्प दिवस असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. महामानवाचे आपण भक्त न होता अनुयायी बनूया असे आवाहनही त्यांनी केले.


यावेळी वंदनाताई करंबळेकर, प्रा. गणेश मर्गज यांनीही शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाची सुरुवात डॉ. पाटकर यांच्या हस्ते मान्यवरांच्या प्रतिमा पूजन करून करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शांताराम असनकर यांनी केले. तर उपस्थित मान्यवरांचे स्वागत विठ्ठल कदम यांनी केले. पाहुण्यांची ओळख मोहन जाधव यांनी केली. सूत्रसंचालन चंद्रशेखर जाधव यांनी केले. तर आभार कांता जाधव यांनी केले.


यावेळी डॉ. पाटकर यांचा संस्थेच्या वतीने शाल, स्मृतिचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तर पाटकर यांच्या हस्ते डॉ. विवेक कदम, डॉ. आकाश जाधव यांचा वैद्यकीय पदवी प्राप्त केल्याबद्दल तर एम एस सी मध्ये स्नेहल व कोमल कांबळी, (वाफोली) यांनी विशेष प्राविण्य मिळविल्यामुळे त्यांचाहा सत्कार करण्यात आला. तर दहावी, बारावी मध्ये विशेष प्राविण्य मिळविलेल्या सर्वश्री, सानिया जाधव (वेर्ले), रिया जाधव (कवठणी), साक्षी कदम (सांगेली), निरज जाधव (आरोंदा), आर्यन जाधव (आंबोली) विनय असनकर (असनीये) या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.