कणकवली नगरपंचायत निवडणूक | 64 मतदारांची निवडणूक अधिकाऱ्यांसमोर सुनावणी

206 मतदारांवर राजकीय पक्षाच्या नेत्यांनी दाखल केल्या होत्या हरकती
Edited by: उमेश बुचडे
Published on: December 05, 2022 17:52 PM
views 365  views

कणकवली : कणकवली नगरपंचायत निवडणूक काही महिन्यावर होत आहे.त्यादृष्टीने मतदार यादी दावे व हरकती नोंद करण्याची मुदत ८ डिसेंबर २०२२ पर्यंत आहे.त्यानुसार २०६ मतदारांवर हरकती राजकीय पक्षाच्या नेत्यांनी दाखल केल्या होत्या. त्यावर ६४ मतदारांची आज कणकवली तहसिलदार तथा निवडणूक निर्णय अधिकारी आर.जे.पवार यांनी सुनावणी घेतली.यावर बीएलओचा अहवाल आल्यानंतर निर्णय देण्यात येणार आहे.

कणकवली शहरातील मयत,स्थलांतरित,दुबार नोंदणी  नवीन मतदार यादी मध्ये मतदार नोंदणी केली आहे.नवीन प्रसिद्ध मतदार यादीवर उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना व भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी  परस्पर विरोधी असलेल्या २०६ मतदारांवर हरकती नोंदविल्या आहेत. 

हरकतीमध्ये मतदाराचे नाव असलेले वास्तव्य, रेशन कार्ड आणि आधार कार्ड पुरावा सादर करण्यास सांगण्यात आले होते.  मतदाराचे इथे वास्तव्यासच नाही फक्त निवडणुकीला मतदान करायला येतो, अशी हरकत काही जणांनी घेतली तर काहींनी निवडणूक कर्मचारी म्हणून बीएलओंनी प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली.त्यामध्ये मतदार कागदपत्रांमध्ये दिलेल्या पत्त्यावर राहत नाही ,असा अहवाल नोंदवला आहे.

हरकती असलेल्या मतदारांमध्ये हर्णे आळी, बाजारपेठ सोनेवाडी, बिजलीनगर, तसेच कणकवलीतील अन्य प्रभागांचाही समावेश आहे. त्यामुळे आता भाजप व उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना या दोन्ही पक्षांनी एकमेकांवर घेतलेला आक्षेपामुळे आता कणकवली नगरपंचायत निवडणूक ही अधिकच रंगतदार होणार असल्याचे चित्र दिसत आहे.