
दोडामार्ग : तिलारी आंतरराज्य प्रकल्पाच्या गोवा हद्दीतील कालव्यांची मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी शुक्रवारी पाहणी केली. यावेळी कुडासे धनगरवाडी येथे कालवा फुटल्याची बातमी त्यांना समजताच गोव्यातील कालव्यांच्या धर्तीवर महाराष्ट्र हद्दीतील कालव्यांची दुरूस्ती करण्यासाठी आपण महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
तिलारी प्रकल्पाच्या गोवा हद्दीतील कालव्यांची पाहणी करण्यासाठी गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचा शुक्रवारी नियोजित दौरा होता. मात्र शुक्रवारी सकाळी कुडासे धनगरवाडी येथे कालवा फुटला आणि परिणामी गोव्याला येणारे कालव्याचे पाणी बंद करावे लागले. मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे शुक्रवारी सकाळी कालव्यांची पाहणी करण्यासाठी आले. यावेळी त्यांना कुडासे येथे फुटलेल्या व महाराष्ट्र हद्दीतील कालव्यांच्या झालेल्या दुरावस्थेबाबत पत्रकारांनी विचारले असता तिलारी धरण प्रकल्प उत्तर गोव्यासाठी महत्त्वाचा आहे.
त्यामुळे ही पाहणी करण्यासाठी आलो आहे. गोव्याच्या धरतीवर दोडामार्ग तिलारी कालव्यांची दुरुस्ती संदर्भात महाराष्ट्र व गोव्यातील जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांची कालव्याच्या दुरूस्ती संदर्भात चर्चा सुरू आहेत. आपण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची लवकरच भेट घेणार असल्याचे सांगत महाराष्ट्र हद्दीतील सर्व कालव्यांची दुरुस्ती ही गोव्यातील कालव्यांच्या धर्तीवर आरसीसी काँक्रिटीकरणाने करावी अशी मागणी करणार असल्याचे सांगितले. त्यामुळे भविष्यात कालवे फुटण्याचे प्रकार थांबतील. शिवाय गोव्यातील शेतकरी, कंपन्या यांसह इतर क्षेत्रासाठी पाण्याचा तुटवडा भासणार नाही असेही मुख्यमंत्री सावंत त्यांनी सांगितले. यावेळी गोव्याचे जलस्त्रोत मंत्री सुभाष शिरोडकर, डिचोलीचे आमदार चंद्रकांत शेटये व गोवा जलसंपदा विभागाचे अधिकारी उपस्थित होते.