दिवाळीच्या तोंडावर हातचं पीक गेलं निघून | शेतकऱ्यांचं दिवाळं !

पाडलोस, शेर्लेत पिकावरून पाणी गेले तर काही ठिकाणी उभी पिके झाली आडवी
Edited by: प्रतिनिधी
Published on: October 21, 2022 18:52 PM
views 129  views

बांदा : शुक्रवारी दुपारी दोन तास बरसलेल्या परतीच्या पावसाचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला. भात पिकासह नाचणी, भुईमूग पिकांची प्रचंड नासाडी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दिवाळी तोंडावर असताना सगळ काही हातच जात असल्याचे सांगत शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आले. 

मडुरा पंचक्रोशीत परतीचा पाऊस चांगलाच बरसला खरा परंतु शेतकरी मात्र रडला. कापणी योग्य झालेले उभे भात पीक आडवे झाले. काही ठिकाणी पावसामुळे शेतात अक्षरशः पाण्याचे तळे साचले अन पिके पूर्णपणे झोपल्याचे विदारक चित्र पहावयास मिळाले. पिकाला आलेले लोम्ब गळून पडल्यास मोठा फटका शेकऱ्याला बसणार आहे. 

आरोस, सातार्डा, दांडेली, न्हावेली, पाडलोस, मडुरा, रोणापाल, कास, निगुडे, शेर्ले, सातोसे, बांदा भागात शुक्रवारी दुपारी मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाट आणि वादळी वारा पाऊस झाला. पाडलोस व शेर्लेत पिकावरून पाणी गेले तर काही ठिकाणी उभी पिके आडवी झाली. त्यामुळे नुकसानीच्या भीतीने शेतकरी चिंताग्रस्त बनला आहे. 

केवळ कुजलेले किंवा कोंब आलेल्या पिकाचा पंचनामा न करता त्यासोबत लोम्ब गळून नुकसान झालेल्या पिकाचेही पंचनामे करावे अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.