
सावंतवाडी : निवडणूक ही शेवटी निवडणूक असते त्यामुळे कोणालाही कमी लेखून चालत नाही. मात्र, महायुतीचे नेते पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी घेतलेल्या मेहनतीमुळे माझा विजय निश्चित आहे. विजयानंतर मतदार संघातील आरोग्य आणि रोजगाराचा प्रश्न प्रामुख्याने सोडविण्यावर माझा भर राहणार असून मतदारसंघातील जनतेच्या जास्तीत जास्त संपर्कात राहण्याचा माझा प्रयत्न राहणार आहे. माझ्यासोबतच जिल्ह्यातील तिन्ही जागांवर महायुतीचा विजय निश्चित असून राज्यातही महायुती स्वबळावर सत्तेत येईल, असा ठाम विश्वास शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केला. तर राज्यात महायुतीला बहुमत असेल असाही दावा त्यांनी केला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढवली गेली आहे. त्यांनी चांगलं नेतृत्व केलं. मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी अडीच वर्षाच्या कार्यकाळात घेतलेले लोककल्याणकारी निर्णय तसेच लाडकी बहीण सारख्या लोकप्रिय योजना यामुळे महाराष्ट्रात निश्चितच महायुतीची सत्ता येईल, महायुतीला स्पष्ट बहुमत मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मात्र, मनसे व इतर समविचारी पक्षांना सोबत आल्यास सर्वांना एकत्र घेऊन काम करणार असेही ते म्हणाले. आमची महायुती भक्कम आहे. विकासाच्या मुद्द्यावर आम्ही सर्व एकत्र आलो आहोत. त्यामुळे मुख्यमंत्री पदासाठी आम्ही भांडत बसत नाही. तिन्ही पक्षांचे प्रमुख मिळून जो निर्णय घेतील तो सर्वांना मान्य असेल. तिन्ही पक्ष मनापासून एकत्र आहेत व पुढील काळातही सर्व एकत्रितपणे राज्याच्या विकासासाठी काम करणार आहोत असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला.
सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांच्या प्रचंड मेहनतीमुळे माझा विजय निश्चित आहे. या निवडणुकीत मी जास्तीत जास्त लोकांपर्यंत प्रचाराच्या माध्यमातून पोहचलो. ज्यांनी ज्यांनी माझ्यासाठी मेहनत घेतली त्यांच्या सहकार्याची जाणीव मी कायम ठेवीन तसेच त्यांच्यासोबत मी नेहमी राहणार असून त्यांचा सदैव ऋणी राहणार असल्याचेही त्यांनी आवर्जून सांगितले.दरम्यान, माझ्या निवडणूकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे, पालकमंत्री रविंद्र चव्हाण, भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, भाजपचे जिल्हा सरचिटणीस महेश सारंग यांच्यासह भाजपचे सर्व स्थानिक पदाधिकारी तसेच युवराज लखमराजे भोंसले, संजू परब व त्यांचे सहकारी, आमच्या पक्षातील अन्य पदाधिकारी व माझे सहकारी तसेच कार्यालयीन कर्मचारी, विविध संघटना तसेच राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर यांनी माझ्यासाठी खूप मेहनत घेतली. त्यांनी केलेल्या कामामुळे विजय निश्चित आहे. प्रत्येकाने चांगलं सहकार्य केलं याची मला जाणीव राहील. विविध संघटनांनी मला पाठिंबा दिला. त्या सर्वांचा मी ऋणी राहीन. उद्याचा निकाल चांगला येईल. राज्यातही महायुतीचीच सत्ता येईल. त्यामुळे येणाऱ्या काळात आरोग्य आणि रोजगाराचा प्रश्न सोडविला जाईल. पर्यटनाच्या माध्यमातून देखील येथील युवकांना तसेच बेरोजगारांना जास्तीत जास्त रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी आपले प्रयत्न राहतील. मागील काळात मंजूर झालेली कामे पूर्ण करण्याला देखील माझे प्राधान्य राहील, असेही दीपक केसरकर यांनी स्पष्ट केले.